कोल्हापूर, २३ सप्टेंबर २०२१ – कोल्हापूर येथील अनुभवी दुचाकी रायडर गायत्री पटेल यांनी TVS Apache RTR 200 4V मोटरसायकलवर सवार होत आज वन ड्रीम, वन राइड – इंडियन ओडिसी राइड यशस्वीपणे पूर्ण केली. भारतभरात तब्बल 30000 किमीचा प्रवास एकटीने करत त्यांनी कोल्हापूर येथील MAI TVS डीलरशीप येथे आपल्या सफरीची सांगता केली. या सफरीदरम्यान गायत्री यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करत त्यांना दुचाकी चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले.
कोल्हापूरस्थित गायत्री यांनी 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि 18 जागतिक वारसा स्थळांचा प्रवास केला. मुंबई, जयपूर, दिल्ली, स्पिती, श्रीनगर, आग्रा, सिलिगुडी, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर, हैद्राबाद, चेन्नई, कोची, कोईम्बतूर आणि बेंगळुरू या ठिकाणी प्रवास करत त्यांनी आज कोल्हापूर शहरात आपल्या सफरीची सांगता केली. त्यांच्या या असामान्य प्रदीर्घ प्रवासाची दखल घेत कोल्हापूरचे आमदार श्री. चंद्रकांत जाधव, कोल्हापूरच्या माजी महापौर श्रीम. निलोफर आजरेकर, टीव्हीएस मोटर कंपनीचे महाराष्ट्राचे एरिया मॅनेजर श्री. अंबरिश अवस्थी, माई टीव्हीएसचे महाव्यवस्थापक श्री. अनिल कांबळे आणि टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रीमियम मोटरसायकल्स विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. शॉन कॉलिन्स यांनी गायत्री यांना भारतातील पहिली TVS Apache RR 310 Build To Order (BTO) मोटरसायकल टीव्हीएस मोटर कंपनी कडून प्रदान केली.
व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असलेल्या गायत्री यांनी आपली आवड जोपासण्यासाठी 2017 च्या सुरुवातीला रायडिंगची सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी TVS Apache RTR 200 4V वरून 65000 किमी अंतर पूर्ण केले आहे. त्यामध्ये कन्याकुमारी, भुतान, स्पिती आणि लेह अशा लांब पल्ल्याच्या प्रवासाचाही समावेश आहे. 2019 मध्ये त्यांनी अंदमान व निकोबार बेटांपर्यंत राइड करणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रवेश केला.