गणित हा मानवनिर्मित विषय असून काहींचा आवडता तर काहींचा नावडता विषय आहे. याचे कारण गणिताबद्दल अवांतर वाचन करण्यासाठी मातृभाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही. गणिताच्या इतिहासाबद्दल अनेक उल्लेख आलेले आणि गणिताच्या संदर्भातील काही प्रारंभिक माहिती संकलित केलेले पुस्तक म्हणजे गणितातील काही पद्धती व चालीरीती , वैदिक गणितासह हे होय असे मत प्रा. डॉ. भालचंद्र करंडे यांनी व्यक्त केले.
आजच्या पिढीमध्ये वाचन संस्काराची रुजवणूक व्हावी म्हणून चला कवितेच्या बनात या चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी कोरोना परिस्थितीतही सातत्याने वाचक संवाद चालू असून याच मालिकेतील २४९ वे पुष्प प्रा.डॉ. राम साबदे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर येथील शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात प्रत्यक्षात आणि फेसबुक लाईव्ह आयोजित करण्यात आले होते. यावेळी गणित विषयाचे अभ्यासक तथा म.उ.म.विद्यालयतील गणित विभाग प्रमुख प्रा.डॉ.भालचंद्र करंडे यांनी शशी बेडेकर लिखित गणितातील काही पद्धती व चालीरीती वैदिक गणितासह या पुस्तकावर संवाद साधताना पुढे म्हणाले आजच्या मुलांना सोप्या पद्धतीने गणित सोडवता येण्यासाठी वैदिक गणित शिकवण्यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी नवनवीन पध्दतीचा अवलंब करून गणिताच्या चालीरीती समजून आल्या तर विद्यार्थ्यींना तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते हे सांगताना कांहीं उदाहरणे ही सोडवून दाखवली.
यावेळी झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर मान्यवरांचा सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर प्रा. डॉ.राम साब्दे यांनी साजेसा अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा गोपाळ पाटील यांनी केले तर आभार प्रा. राजपाल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामभाऊ जाधव, गोविंद सावरगावे आणि अनंत कदम यांनी प्रयत्न केले.