कोल्हापूर ता.15 : शाळेच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 चा पहिला दिवस. महापालिकेच्यावतीने सर्व शाळेत मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. महापालिकेच्या नेहरुनगर शाळेत दरवर्षी वेगळी थीम वापरुन नविन विद्यार्थांचे स्वागत केले जाते. यावर्षी मुलांची आवडती बस म्हणजे लंडन बस….या बसने इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचे ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी नेहरुनगर शाळेत 100 हून अधिक नविन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरणही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर महानगरपालिका शाळास्तरावर राबविला जाणार असलेला मी इंग्रजी बोलणार व गणित झाले सोपे या उपक्रमांच्या हस्तपुस्तिकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक निरीक्षक रवींद्र चौगले, प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार, माजी सभागृह नेता दिलीप भुर्के, माजी शिक्षण सभापती पद्मजा भुर्के, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ विनायक शिंदे, महेश सावंत, मुख्याध्यापक शहाजी घोरपडे, शांताराम सुतार, सर्व शिक्षक, सेवक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
महापालिकेच्या 58 शाळेमध्ये महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांची व वरिष्ठ कर्मचाऱ्यांची विद्यार्थ्यांच्या स्वागतांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी या सर्व शाळेत महापालिकेचे सर्व अधिकारी, वरिष्ठ कर्मचारी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट व टोपी देऊन स्वागत केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, ड्रेस व दप्तरचे वाटप करण्यात आले. मोरे कॉलनी तपोवन ग्राऊंड शेजारील छत्रपती संभाजी विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताशा लावून मिरवणूकद्वारे मुलांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, माजी प्रशासन अधिकारी पी.जी.साठे व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.