कोल्हापूर, : सिंगल युज प्लॅस्टीक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर उदयापासून कडक कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिल्या .श्री रेखावार यांनी सिंगल युज प्लॅस्टीकबाबत गठीत समितीची आज दूरदृष्प प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली .यावेळी ते बोलत होते .
जेथे संबंधित ठिकाण सिल करण्याची आवश्यकता आहे अशी ठिकाणे सिल करण्यात यावीत तसेच संबंधितांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दंडही ठोठावण्यात यावा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व न .पा . मुख्याधिकारी , गटविकास अधिकारी , तसेच मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या .
महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टीक बंदीबाबत केलेले नियम हे कडक असून या नियमांची संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करायची आहे. यामध्ये कुचराई करणाऱ्यांना ‘कारणे दाखवा ‘ नोटीस बजावण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला .
शेतीसाठी, बागकामासाठी लागणारे तसेच नागरी घन कचऱ्यासाठी वापरण्यात येणारे कंपोस्टेबल प्लॅस्टीक वगळता त्याचा वापर पूर्णपणे बंद करायचा असल्याचेही ते म्हणाले .
शहरातील व गावातील व्यापारी संघटना, मंगल कार्यालये, कॅटरींग व्यवसाय, हॉटेल, किराणा असोसिएशन, भाजीपाला विक्री संघटना, केमिस्ट संघटना यांनी प्लॅस्टीकचा वापर टाळण्याकडे लक्ष दयावे असे आवाहनही त्यांनी केले तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी प्लॅस्टीक कचरा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रथम दंडात्मक कारवाई करुन त्यानंतर तिस-यांदा उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व न. पा मुख्याधिकारी , जि.प.च्या प्रियदर्शनी मोरे , गटविकास अधिकारी तसेच मनपाचे संबधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते .
