कोल्हापूर, दि. १०:प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असलेल्या भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली. राज्यातील एक लाखाहून अधिक पात्र भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी जागा दिलेली नाही काय, असा सवालही श्री. मुश्रीफ यांनी विचारला आहे.
आमदार श्री. मुश्रीफ यांच्या या मागणीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील दोन कोटी, ९५ लाख नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मूलभूत सुविधांसह घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पात्र भूमिहीन लाभार्थ्याला घरासाठी जागा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५०० चौरस फुटांच्या जागा खरेदीसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य योजना आहे. एक जानेवारी २०११ पूर्वीची निवासी जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे, भाडेपट्टा बक्षीसपत्र इतर मार्गाने जागा उपलब्ध करून देणे, तसेच अमृत अभियानांतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे हा उपक्रम अग्रक्रमावर असल्याचे स्पष्ट केले. तसेच, १,२९,७०५ भूमिहीन लाभार्थ्यांपैकी ६८,२५५ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित, ६१,४५० लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही उत्तरात म्हटले आहे.
