कागलमध्ये २०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप
कागल, दि. २७: गेल्या ३० -३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत गोरगरिबांची सेवा करीत आलो आहे. यापुढे गोरगरीब निराधार जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे. त्यांची सेवा हेच माझे जीवितकार्य आणि पुण्याई आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले.
कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या २०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, समाजातील विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग यांचे डोंगराएवढे दुःख असते. वृद्ध माणसे ज्यांना मुले -सुना बघत नाहीत, त्यांची परवड तर अत्यंत वेदनादायक असते. या सगळ्यांच्या चरितार्थासाठी ही पेन्शन उपयोगी पडते.
प्रास्ताविकात भैय्या माने म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ हे समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे नेतृत्व आहे. या योजनेतील २० हजार रुपये उत्पन्न मर्यादेची आठ शिथिल करून ती ५० हजार रुपयांपर्यंत करणे. तसेच; या योजनेतील लाभार्थ्यांची मुले २५ वर्षाची झाल्यानंतर त्यांची पेन्शन बंद होते. ती पेन्शन कायमस्वरूपी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
” पेन्शनवाढीच्या पाठपुराव्याला यश……….”
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये “निराधारांना नियमितपणे दरमहा दोन हजार रुपये पेन्शन द्या,” अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन ही पेन्शन दरमहा दीड हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ती लवकरच सुरू होईल. पेन्शन दोन हजार रुपये होईपर्यंत पाठपुरावा करीतच राहू.
यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक प्रवीण काळबर, नवाज मुश्रीफ, सुनील कदम, अस्लम मुजावर, सुनील माळी, राजेंद्र माने आदी प्रमुख उपस्थित होते.
