वंदूर :वार्ताहर -मी पाच वेळा आमदार व वीस वेळा मंत्री झालो.पण मंत्रिपदाच्या माध्यमातून लोककल्याणकारी कामे व गोरगरीब जनतेचे हित जोपासण्याचे काम केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
लिंगनूर दुमाला ता. कागल येथील सात कोटी च्या विविध विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले, १०५ भारतीय जनता पार्टीचे, 56 शिवसेनेचे विधानसभेवर सदस्य निवडून आले होते. त्यांची निवडणूक पूर्वीच युती ठरली होते. यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर होतो पण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टीने पाळला नाही. ते नाराज झाले.यावेळी देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या चाणक्य नीतीने व सोनिया गांधी यांच्या सहकार्याने उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करण्यात आले त्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री पदाची मी शपथ घेतली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व राज्यांमध्ये ग्रामीण विकास खात्याचा मंत्री म्हणून एकही विकासाचं काम शिल्लक ठेवणार नाही. यासाठी रात्रीचा दिवस मी करेन. शेकडो कोटींचा निधी आपण आणला. आपण शेतमजूर कल्याणकारी मंडळ, रिक्षा ड्रायव्हर कल्याणकारी मंडळ व यंत्रमाग धारक कल्याणकारी मंडळ स्थापन करून या माध्यमातून कल्याणकारी योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजयबाबांच्याकडे कोणतीही सत्ता नसताना त्यांचे कार्यकर्ते बाबांसोबत प्रामाणिक राहिले यातच बाबांचा मोठेपणा लक्षात येतो.
यावेळी बोलताना संजयबाबा घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफ चेअरमन असलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शून्य टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज देणारी बँक देशातील एकमेव आहे. लोकांनी दिलेल्या सामर्थ्यावर दिन दलितांचे अश्रू पुसण्याचे काम मुश्रीफांनी केला आहे. जनसामान्यांचे व दिन दलितांचे काम त्यांच्या हातून होत आहे. लोक कल्याणकारी योजना आपण राबवूया असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जे. एस. जाधव, एस. के. तोडकर, विजयराव जाधव, मारुती संकपाळ, माजी सभापती रमेश तोडकर, ओंकार बावचे, विशाल कांबळे यांची मनोगते झाली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. छाया तोडकर यांनी केले. तर प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील के. डी.सी.सी बँकेचे संचालक भैय्या माने, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, सभापती जयदीप पवार, सरपंच वंदना बागडी, उपसरपंच सीमा तोडकर, भगवान बुजरे, धनराज घाटगे, अशोक नवाळे, बाळासाहेब तुरंबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अरुण तोडकर यांनी मानले.