बाळेघोल (ता. कागल) येथे अनैतिक संबंधाच्या वादातून गावटी पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा खून करण्यात आला. भरत बळीराम चव्हाण (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना आज (दि.६) सकाळी ११ च्या सुमारास कापशी – बाळेघोल रस्त्यावरील चिगरे शेत परिसरात घडली. या प्रकरणी विकास हेमंत मोहिते (वय २२) या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ग्रामस्थ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी विकास याचे भरतच्या पत्नीशी अनैतिक संबध असल्याचा संशय भरत चव्हाण याला होता. यावरून दोघात वारंवार वाद होत असे. या वादातून चव्हाण याने पत्नीला घटस्फोट दिला आहे. यातून वारंवार एकमेकांना बघून घेण्याची भाषा होत असे. वाद विकोपाला गेला. अखेर वादाचे पर्यावसान खुनात झाले.
मयत चव्हाण आणि मजूर ओंकार जाधव हे दोघे चव्हाण याची दुचाकी (एम.एच.09 ई.के.1926) वरून विहिरीतील गाळ काढण्याच्या कामासाठी चिगरे शेतीत जात होते. दोघांचा पाठलाग करीत संशयिताने गाठून त्यांना वाटेत अडवले.ओंकार जाधव याला गाडीवरून उतरण्यास भाग पाडले. जाधव काही अंतरावर पुढे चालत गेल्यानंतर संशयित विकास आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. रागाच्या भरात विकासने आपल्या जवळ लपवलेले पिस्तूल काढून भरतच्या डोक्यात गोळी घातली. गोळीबाराचा आवाज ऐकून जाधव माघारी फिरला. त्यांने आरडाओरडा केला. मात्र, निर्जन परिसरात कोणीही नव्हते.