आजी-आजोबा म्हणजे खेडेगावातल हासतं-खेळतं विद्यापीठ. जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्याची दिशा दाखवत संस्काराची पेरणी करणारे खरे मार्गदर्शक. अशा कितीतरी आठवणींची साठवण असलेली बॅग ऑफ स्टोरीज म्हणजे नात्यातलं प्रेम वाढवणाऱ्या गोष्टींचा संग्रह होय असे मत संचित बोरगावे याने व्यक्त केले.
आजोबा शिवाजीराव जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या 325 व्या विशेष बाल वाचक संवादामध्ये संचित संध्याराणी रमाकांत बोरगावे, हा नांदेड येथील नागार्जून पब्लिक स्कूल मध्ये 8 व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सूधा मुर्ती लिखित ग्रॅन्ड पॅरेंन्ट्स बॅग ऑफ स्टोरीज या इंग्रजी साहित्यकृतीवर सुंदर असा संवाद साधताना तो म्हणाला, वाचनाची सुरुवात करायची असेल तर हे पुस्तक वाचलं पाहिजे. नातेसंबंध जोडणे आणि नात्यातलं प्रेम वाढवण या गोष्टी शिकवणारे हे पुस्तक असून कोरोना काळात घडलेल्या घटनांचे संदर्भ देऊन आजी-आजोबांनी सांगितलेल्या या सगळ्या कथा आहेत.
वाचक संवादावेळी डॉ. दत्तात्रय देवकत्ते, मा. गट शिक्षणाधिकारी बालाजी बिरादार, प्राचार्य डॉ.शिवाजीराव सगर, तुळसीदास बिरादार , मोहन निडवंचे, गुंडप्पा पटणे यांचे सह अनेकांनी चर्चेत सहभाग नोंदवला. यावेळी अथर्व उगीले व कु. प्रगती मुंढे या दोन बाल वाचकांनीही त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल माहती सांगितली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना शिवाजीराव जाधव यांनी आपला नातू इंग्रजी पुस्तकावर एवढा सुंदर बोलला याचे कौतुक व्यक्त करून हा कार्यक्रम सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे व याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहानही केले.
शासकीय दुध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या वाचक संवादचे सूत्रसंचालन रिझर्व्ह बॅंक अधिकारी मुरलीधर जाधव यांनी केले तर आभार प्रा. चिटगिरे आर.एस. यांनी मानले. या वेळी अनंत कदम यांच्यासह सर्व संयोजकांनी मी मतदान करणारच अशा चिठ्या खिशाला लावून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास परिसरातील अनेक वाचक रसिकांसह बालगोपाळ मोठ्या संखेने उपस्थित होते.