प्रशांत दामले हिटलर, आनंद इंगळे चर्चिलच्या तर वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, प्रणव रावराणे, गणेश मयेकर,रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर इतर महत्वाच्या भूमिकांमध्ये
विवेक फिल्म्स, मयसभा करमणूक मंडळीकृत परेश मोकाशीलिखित-दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी व दिलीप शितोळेनिर्मित ‘मु. पो. बोंबीलवाडी’चा ट्रेलर आज मुंबईत येथे प्रदर्शित करण्यात आला. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत असून त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार आहे. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांच्या उपस्थितीत ट्रेलरचे प्रदर्शन झाले.
विवेक फिल्म्स् आणि मयसभा करमणूक मंडळीकृत ‘मु. पो. बोंबीलवाडी’ची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, भरत दिलीप शितोळे यांची असून लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. पटकथा आणि संवाद परेश मोकाशी यांनीच लिहिले आहेत. संगीत आणि पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांचे आहे.
प्रशांत दामले हे चित्रपटात हिटलरच्या तर आनंद इंगळे चर्चिलच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.
हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर येणारा लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांचा हा चित्रपट आहे. मोकाशी यांची विनोदाची पठडी आणि त्यांच्या ‘मु. पो. बोंबीलवाडी’ नावाच्याच नाटकावर बेतलेल्या या चित्रपटाकडून रसिकांच्या आशा खूप उंचावल्या आहेत. त्यातच चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्यानेही प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच ट्रेलरमध्ये अनेक गमतीशीर प्रसंग समोर येतात. हिटलरच्या भूमिकेतील प्रशांत दामले आणि इतरांच्या तोंडी धमाल संवाद आहेत आणि त्याची झलक या ट्रेलरमध्ये दिसते.
दाढी करत असलेला हिटलर ती करणाऱ्याशी जर्मनमध्ये बोलतो, तर पार्श्वभूमीवर आवाज येतो, “परदेशी पात्रेही आता मराठीत बोलतील.” हिटलर म्हणतो, “माझ्या डिक्शनरीत प्रोब्लेम हा वर्ड नाही.” त्यावर पुन्हा आवाज येतो, “शुद्ध मराठीत!” दुसऱ्या फ्रेममध्ये चर्चिल स्वतःचे नाव घेतो, तर त्यालाही शुद्ध मराठीत बोलण्याच्या सूचना दिल्या जातात. “विन्स्टन चर्चिल नाव आहे माझे, ते मराठी कसे बोलणार?” असा प्रश्न चर्चिलला पडतो.
ट्रेलरमधील दुसऱ्या एका दृश्यात हिटलर म्हणतो, “जपानने महत्वाचा शोध लावेलेला आहे, मी स्वतः जपानला विमान चालवत जाणार आहे, तुम्ही येताय जपानला.” सहकाऱ्यांना विचारलेल्या या प्रश्नावर एक म्हणतो, “मला विमान लागते.” दुसरा म्हणतो, “माझे धडे बसतात.”तिसऱ्या एका प्रसंगात हिटलरचे पिस्तुल मिळाल्याचा संवाद आहे. “हिटलर मेला असेल तर?,” एकाची शंका. तर दुसरे पात्र म्हणते, “तार पाठवली पाहिजे जर्मनीला, हिटलर सिरीयस स्टार्ट इमेडीएटली!” आणखी एका प्रसंगात नाटकाची रिहर्सल चालली आहे. “तिकडे हिटलर-चर्चिल जगाची भादरत आहेत. इथे तुम्ही या नाटकाची भादरत आहात.”
एका प्रसंगात तीन हिटलर समोरासमोर येतात आणि ओळख पटविण्यासाठी एकमेकाची परीक्षा घेतात. आणखी एका प्रसंगात हिटलर-चर्चिल सामोरासामोरे येतात. अशी धमाल दृश्ये आणि प्रसंग चित्रपटाची धाटणी स्पष्ट करतातच पण चित्रपटाबद्दल कुतूहलही वाढवतात. मोकाशी यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांप्रमाणेच ‘मु. पो. बोंबीलवाडी’सुद्धा वेगळे आणि धमाल मनोरंजन देणार, याविषयीची खात्री या ट्रेलरच्या माध्यमातून पटते.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच ‘मु. पो. बोंबीलवाडी’बद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली होती. आधी ‘कोण होणार हिटलर?’ ही उत्सुकता होती आणि त्याचे उत्तर मिळाल्यावर ती अधिक वाढत गेली. त्यानंतर चित्रपटाचे प्रमोशनल साँग अर्थात प्रसारगीत प्रदर्शित झाले आणि या ‘कॉपीराइट फ्री’ गाण्याने धमाल उडवून दिली. त्याआधी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून ही चित्रपट निर्मिती संहितेत काही बदल करून केली गेली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे एक लाफ्टर राईड आहे. प्रशांत दामले यात हिटलर करत असल्याने चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे.”
प्रशांत दामले यांनी हिटलर कसा दिला आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, मोकाशी म्हणाले, “हा प्रश्न मला खरेतर खऱ्या हिटलर विचारावासा वाटतो, की ‘काय रे तुझे जमले आहे का? तुला असे वगायाला जमेल का आयुष्यात.”
हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. “कलाकारांची आणि इतर तंत्रज्ञांची उत्तम साथ मिळाल्याने चित्रपटाची भट्टी चांगलीच जमून आली आहे. आजच्या ट्रेलरनंतर प्रेक्षक चातकासारखी चित्रपटाची वाट पाहतील याची मला खात्री आहे.”
चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे श्री भरत शितोळे म्हणाले, “चित्रपटाच्या घोषणेपासूनच आम्हाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट सर्वच अंगांनी उत्तम जुळून आला आहे रसिकांना तो नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”