डॉ धनंजय दातार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स, दुबई, संयुक्त अरब अमिरात (यूएई)
आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प खरोखर विकासाभिमुख आहे. केंद्र सरकारने कृषी, लघु व मध्यम उद्योग, गुंतवणूक व निर्यात हे प्रगतीचे चालक घटक (इंजिन्स) मानले असून त्यात भरीव व दूरगामी परिणाम घडवणारी पावले टाकली आहेत. नव्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा फायदा कमी कृषी उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांतील १.७० कोटी शेतकऱ्यांना होईल व कृषी उत्पादन वाढेल. डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच फळे व भाज्या आणि कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आखलेली दीर्घकालीन योजना स्वागतार्ह आहे. लघु व मध्यम उद्योजकांना विनातारण हमी कर्ज साह्य पाच कोटी रुपयांवरुन वाढवून दहा कोटी रुपये करणे आणि महिला तसेच अनुसूचित जाती व जमाती गटांमधील प्रथमच उद्योजक बनणाऱ्यांना पुढील पाच वर्षांत दोन कोटी रुपयांपर्यंतचे मुदत कर्ज देणे या योजनांमुळे उद्योजकतेत नक्कीच वाढ होईल. तरुणांमध्ये जागतिक दर्जाच्या कौशल्य विकासासाठी पाच नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करणे, खासगी क्षेत्राला संशोधन, विकास व अभिनवता पुढाकार राबवण्यासाठी २० हजार कोटींच्या निधीची तरतूद करणे आणि निर्यात वाढीला उत्तेजन देण्यासाठी देशी उद्योगांना साह्य व प्रोत्साहन देणे, ही सरकारची पावले नक्कीच कौतुकास्पद आहेत.
