[ स्वर्गीय रतन टाटा स्मृती विशेष वाचक संवादात प्रा. डॉ. बालाजी घारूळे यांनी उलगडले पारसी समाजाच्या यशाचे मर्म. स्वर्गीय रतन टाटा यांच्या जीवनातील अनेक घटना व प्रसंगाना उजागर करत साधला संवाद. ]
( प्रतिनिधी, ) पृथ्वी, अग्नी आणि जल ज्यांचे श्रद्धास्थान आहेत. सत्य बोलणे व दयाळूपणा हाच ज्यांचा मानसन्मान, साधी राहणी, गरजे पुरत्याच वस्तुंचा वापर करत आपला व्यवसाय चिकाटीने करून, व्यवहारातील तत्त्वनिष्ठा न सोडता. प्राणीमात्रावर प्रेम करणारा शांतताप्रिय असा पारशी धर्म आहे. अशा या पारशी धर्माचा इतिहास उलगडणारी साहित्यकृती म्हणजे ‘बावाजींच्या सुरस कथा’ होय असे मत प्रसिद्ध साहित्यिक तथा समाज अभ्यासक प्रा.डॉ. बालाजी घारूळे यांनी व्यक्त केले.
प्रा.सुरेश शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या स्वर्गीय रतन टाटा स्मृती विशेष 324 व्या वाचक संवादामध्ये प्रा. डॉ. बालाजी घारुळे, संगमनेर, यांनी किशोर आरस लिखित बावाजींच्या सुरस कथा आणि इतर ललित लेख या साहित्यकृतीवर सुंदर असा संवाद साधताना ते म्हणाले, चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कृती करणे हे पारशी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. बाराशे वर्षांपूर्वी इराण हा देश सोडून, आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरून मुंबई स्थायिक झाला. हे आपल्या संस्कृतीच्या जपूनुकीसाठी. शुद्धतेच्या आवेद खडकावर आपल्या संस्कृतीचा दीपस्तंभ उभारला. या दीपस्तंभाच्या उजाळ्यात हिंदुस्थानातील मागास समूहाला मध्यवर्ती जगतात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. तेही आपल्या संपत्तीच्या वाट्यातून. हे एक अद्वितीय काम पारशी समाजाने केले. हे त्यांच्या सामाजिक बांधिलकी मधून पुढे आले. त्याच्या अनेक सुरस कथा किशोर आरासने सांगितल्या. या कथा सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहेत.
वाचक संवादावेळी तुकाराम धुमाळे, तुळसीदास बिरादार , मोहन निडवंचे, बाबुराव सोमवंशी, यांचे सह अनेकांनी चर्चेत सहभाग नोंदवला. यावेळी कु.शर्वरी सोमवंशी व संचित बोरगावकर या दोन बाल वाचकांनीही त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल माहती सांगितली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्रा.सुरेश शिंदे म्हणाले की, स्व.रतन टाटा यांच्यासारख्यामुळे आपला देश प्रगती करू शकला आहे. आजचा हा वाचक संवाद त्यांना समर्पित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले.
शासकीय दुध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या वाचक संवादचे सूत्रसंचालन विरभद्र स्वामी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. म.ई.तंगावार यांनी करून दिला तर आभार तुकाराम बिरादार यांनी मानले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शिवाजी सगर , उद्योजक कचरूलाल मुंदडा, प्राचार्य नामदेव खंडगावे, रिझर्व्ह बॅंक अधिकारी मुरलीधर जाधव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक यशवंतराव बिरादार यांचे सह परिसरातील अनेक वाचक रसिक उपस्थित होते.