कोल्हापूर दिनांक १८ एप्रिल-मे 2021 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन ती रचना अंतिम केली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी महानगरपालिकेने सर्व प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत व या मतदार याद्यांवर अक्षेप/ हरकती नोंदवण्यासाठी दिनांक 23 फेब्रुवारी 2021 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोगाच्या दिशादर्शक तत्त्वानुसार Free & Fare होण्यासाठी मुळात मतदार याद्या पूर्णपणे निर्दोष असणे गरजेचे आहे. दिनांक 16 पासून भारतीय जनता पार्टीने विविध प्रभागातील प्रारुप मतदार याद्यांचा अभ्यास केल्यानंतर या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाच्यावतीने आज उपायुक्त निखील मोरे यांना प्रारुप मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्याबाबत व या सर्व प्रक्रीयेबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
याप्रसंगी अशोक देसाई यांनी प्रारुप मतदार यादीमधील गोंधळाबाबत सविस्तर वर्णन केले. केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नाही तर हजारोने नावे एका मतदार संघातून दुसऱ्या मतदारसंघात गेलेली आहेत. एका प्रभागातील मागील निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत असणारी शेकडो नावे अचानक दुसर्या प्रभागात गेल्याचे सांगितले.
सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी प्रारूप मतदार यादीमधील त्रुटी ही गंभीर बाब असून हरकती घेण्यासाठी जी मुदत दिली आहे त्यामध्ये मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. बीएलओ व सर्व्हेअर यांनी कोणत्याही प्रभागात जबाबदारीने काम केले नसल्याचे यामधून दिसून येत आहे असे सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे यांनी बहुतेक सर्व प्रभागांमध्ये सीमारेषेवरील नावांची मोठ्या प्रमाणात आदला बदल झाल्याचे सांगितले. उदाहरणादाखल प्रभाग ६ मधील २०१५ मधील मतदार यादीमधील बरीच नावे आत्ता प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
अमोल पालोजी, धीरज पाटील, दिनेश पसारे यांनी देखील आपाआपल्या प्रभागातील मतदार याद्यांचा घोळ निदर्शनास आणून दिला. प्रभाग क्रमांक 47 मधील देशपांडे गल्ली, खरी गल्ली परिसरातील बहुतेक सर्व मतदार प्रभाग क्रमांक 48 मध्ये समाविष्ट झालेले दिसतात. प्रभाग क्रमांक 49 मधील बाबूजमाल परिसरातील शेकडो मतदार प्रभाग 48 मध्ये समाविष्ट झाल्याचे दिसते. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 32 व 33 मध्ये सीमारेषेवरील मतदारांची मोठ्या प्रमाणावर अदला बदल झालेली दिसते आहे. याच प्रकारे २७, ३२ या प्रभागात देखील अशा पद्धतीच्या त्रुटी झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. हे पाहता शिष्टमंडळाने शहरातील सर्वच प्रभागात कमी-अधिक प्रमाणात यादीत घोळ झाल्याचे मत व्यक्त केले.
