ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थातच सर्वाचे लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावरही मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा होणार आहे. छोटे उस्ताद आपल्या सुरांनी अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालत आहेत. मराठी भाषादिनी म्हणजेच २७ फेब्रुवारीच्या विशेष भागात अस्सल मराठी गाणी सादर करत छोटे उस्ताद कुसुमाग्रजांना सुरेल श्रद्धांजली वाहणार आहेत. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे पहिल्या भागापासून या मंचावर स्पर्धक मराठी गाणीच सादर करतात. मायबोली मराठी भाषेचा गोडवा जपण्याचा प्रयत्न मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा मंच सातत्याने करतो आहे. स्पर्धकांना आपल्या मायबोली मराठीचा लळा तर आहेच तो द्विगुणीत व्हावा यासाठी जज आदर्श शिंदेने स्पर्धकांना मराठी भाषा दिनी मराठी पुस्तकांची अनोखी भेट दिली. सोशल मीडियाच्या काळात वाचनाची आवड कुठेतरी मागे पडतेय. लहान मुलांमध्ये ही आवड रुजवण्यासाठी आदर्शने हा स्तुत्य प्रयत्न केला. आदर्श मुलांसाठी नेहमीच गिफ्टस देत असतो. त्यामुळे सेटवर त्याला सर्व गिफ्ट बाबा म्हणतात. पण आदर्शने पुस्तकांची दिलेली ही खास भेट प्रत्येकाच्याच मनात आणि घरात कायम जपली जाईल.
तेव्हा मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा हा खास भाग पाहायला विसरु नका २६ आणि २७ फेब्रुवारीला फक्त स्टार प्रवाहवर.
