कोल्हापूर : ज्योतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेदरम्यान सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज आहे. यात्रेपूर्वीच ज्योतिबा डोंगरावरील वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ज्योतिबा डोंगराकरिता केर्लीसह पन्हाळा व कोडोली उपकेंद्रातून पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध केली आहे. मंदिरालाही तीन वितरण रोहित्रांवरून वीज दिलेली आहे. महावितरणच्या अभियंते, वीज कर्मचाऱ्यांची ४८ जणांचे पथक तैनात आहे.
ज्योतिबा डोंगरावरील वीज पुरवठ्याचा बळकटीकरणाची कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात आली आहेत. लघुदाब उपरी वाहिनी ६.४१ किमी भूमिगत केली आहे. सुरक्षिततेच्या हेतूने ६०८ वीज ग्राहकांच्या २२.४१ किमी सर्व्हिस वायर भूमिगत करण्यात आलेल्या आहेत. देवस्थान परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहन पार्कींगकरता विशेष व्यवस्था केली आहे.मा.जिल्हाधिकारी यांचे सूचनेनुसार त्या ठिकाणी वीज सुविधा उपलब्ध केली आहे.
यात्रेपूर्वी वीज यंत्रणा देखभाल दुरुस्ती त्यात वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, रोहित्र दुरुस्ती, वीज वाहिन्यांचे घर्षण होऊ नये म्हणून स्पेसर्स बसविणे, फ्युजबदलणे, उपकेंद्र दुरुस्ती ,जुन्या वायर्स बदलणे, फीडर पिलर दुरुस्ती इ. कामे करण्यात आली आहेत.
यात्रेदरम्यान सुरळीत वीज पुरवठा ठेवण्यासाठी १० अभियंते व ३८ वीज कर्मचारी देवस्थान व ग्रामपंचायत नियंत्रण कक्ष, ८ गस्ती पथकांसाठी तिथे तैनात आहेत. आपत्कालीन स्थितीसाठी १०० केव्हीए क्षमतेचा अतिरिक्त रोहित्र व इतर साहित्यसाठा ठेवण्यात आला आहे. ठिक-ठिकाणी भाविकांच्या जागृतीकरिता वीज सुरक्षेबाबत फलक प्रदर्शित केले आहेत.
