कोल्हापूर, : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहुंचे कार्य पाहता असा राजा होणे नाही. शिक्षण, कला, क्रिडा व शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य भावी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. कोल्हापूरात म्हैसुरसारखी ऐतिहासिक बाग उभारणेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते, बहुजन उद्धारक, सामाजिक क्रांतीचे प्रवर्तक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती जतन करण्यासाठी राधानगरी धरण पायथ्याशी उभारलेल्या स्मृती केंद्राचा उद्घाटन समारंभ व कृतज्ञता सोहळा आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापुरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, समाजातील पुरोहितशाही, अज्ञान व अस्पृष्यता नाहीशी करण्यासाठी महात्मा फुले यांनी चळवळ सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हीच चळवळ आपल्या संस्थानात प्रत्यक्ष कृतीद्वारे चालू ठेवली. उपेक्षित, वंचित समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले- शाहूंच्या विचारांचा प्रत्यक्ष भारतीय राज्यघटनेत समावेश करून खरी लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या समाज सुधारकांनी सुरू केलेले समाजोद्धाराचे कार्य अजून संपलेले नाही. उलट सध्याची देशातील राजकीय तसेच सामाजिक परिस्थिती पाहता या महान समाज सुधारकांचे कार्य आणि विचार अधिक नेटाने, व्यापक पातळीवर पुढे नेण्याची आवश्यकता आहे.
लोकराजा शाहुंनी राधानगरी धरणाची निर्मिती करुन कोल्हापुर जिल्हा सुजलाम सुफलाम केला त्यांचे स्मृतीस्थळ या ठिकाणी व्हावे यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, खा.संजयदादा मंडलीक व अभिजित तायशेटे यांनी सतत पाठपुरावा केला, त्यांचे यावेळी विशेष कौतुक सतेज पाटील यांनी केले.
छत्रपती शाहू महाराजांचे कार्याचे सुसज्ज ग्रंथालय व संशोधन केंद्र लवकरच स्थापण करु-उदय सामंत
शाहुंचे विचार पुढे नेणे व स्मृती जपण्याची गरज आहे.सर्वसामान्य लोकांना नीतिवंत बनवण्याचे साधन म्हणजे शिक्षण आहे. आणि जी व्यक्ती शिक्षण घेईल ती नक्कीच जगाच्या पाठीवर यशस्वी होतानाच मनावर असलेले मानसिक गुलामगिरीचे जोखड उतरवून, विचारांच्या बुरसटलेल्या कल्पना सोडून, मानवतावादी नवीन विचारांना आत्मसात करेल. हाच शिक्षणाच्या महत्तेचा धडा कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज यांनी जनतेसाठी गिरवला. नुसताच गिरवला नाही, तर त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला त्याच्या स्वत्वाची ओळख करून दिली. त्यांच्या शिक्षण प्रसारक धोरणांचा आजही अभ्यास होणे गरजेचे आहे. राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सकारात्मक आहेत. याठिकाणी शाहुंचे कार्याचे सुसज्ज ग्रंथालय व संशोधन केंद्र लवकरच स्थापण करु, अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.
खासदार संजय मंडलीक म्हणाले की, छत्रपती शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणारा उपक्रम ठरला. संस्थानी मुलाखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा’ करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
खासदार धैर्यशिल माने म्हणाले की, महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीत सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून कोल्हापूर संस्थानाचे राजे शाहू महाराज यांचे नाव अग्रस्थानी येते. समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य राजर्षी शाहू यांनी केले. सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रांत शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी केलेले कार्य विशेष महत्त्वाचे आहे. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी शिक्षणाला जे महत्त्व दिले त्याचे फलित आज सर्व देश पाहत आहे. राधानगरीच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले तेव्हा त्यांनी बहुजन समाजाला आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानले. राजा असूनही ऋषींसारखे जीवन जगताना त्यांनी आपल्या राजदंडाचा वापर हा दलित-पतित, तसेच दीनदुबळ्या, वंचित घटकांसाठी केला. राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे ११० कोटीचा विकास आराखडा सादर केला असुन त्यातील २५ कोटी मंजुर झाले आहेत. सदर कामे प्रगतीपथावर असून तालुक्याच्या परिपूर्ण विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
यावेळी श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती, अरुण दुधवडकर, विजय देवणे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, छ.शाहु महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजीत तायशेटे, गटविकास अधिकारी डॉ.संदीप भंडारे, तहसीलदार मिना निंबाळकर तसेच राधानगरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाहु स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे व आभार राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी यांनी मानले.
