कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान होणारी सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यात 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती होणार आहे. या सैन्य भरतीमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर गोवा व दक्षिण गोवा या जिल्ह्यातील अंदाजे 80 हजार युवक सहभागी होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आर्मी रिक्रुटींग ऑफिसचे संचालक कर्नल पाल तसेच त्यांचे सहकारी, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर, सैन्य भरतीशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सैन्य भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मैदान व्यवस्था, विद्युत व्यवस्था, उमेदवारांची भोजन व राहण्याची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.
