कोल्हापूर ता.04 : स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाअंतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात तिरंगा राखी विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहे. दि. ११ तारखेला होणाऱ्या रक्षाबंधनासाठी या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटाच्या माध्यमातून या तिरंगा राख्या बनविल्या जात आहेत. या बचत गटाच्या स्टॉलला आमदार जयश्री जाधव, प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर व सहा.संचाल नगररचनाकार रामचंद्र महाजन यांनी भेट दिली. हा स्टॉल महापालिकेच्या मुख्य चौकाबरोबरच चारही विभागीय कार्यालयाच्या परिसरात व पंत बाळेकुंद्री मार्केट येथील शहर उपजिविका केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. महिला बचत गटांना हे स्टॉल उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय नागरी उपजिविका विभागातील रोहित सोनुले, निवास कोळी, विजय तळेकर, सौ.स्वाती शाह, श्रीमती अंजनी सौदलगेकर यांनी विशेष प्रयत्न केले. तरी या बचत गटाच्या स्टॉलला नागरीकांनी भेट देऊन या राख्या खरेदी करुन बचत गटाच्या या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी केले आहे.
महिला बचत गटाच्या माधमातून शहरात जनजागृती
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. यासाठी महापालिकेच्यावतीने दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे घर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटाच्या माधमातून शहरात जनजागृतीचे काम सुरु आहे.
महानगरपालिका राबवीत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात जवळपास १२०० हून जास्त महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माधमातून ४५ वस्ती स्तर संस्था स्थापन झाले आहेत. या वस्ती स्तर संघाच्या माधमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या दृष्टीने दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्येक नागरिकांनी घरासमोर सडा-रांगोळी काढावी, घराला तोरण बांधावे व दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या तीन्ही दिवशी घरावर तिरंगा झेंडा मार्गदर्शक सूचनेनुसार लावावा याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
