गोरंबे, देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमचा कोल्हापूर जिल्ह्यातील गोरंबे (ता.कागल) येथे लोकार्पण उत्साहात झाला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती, भावउत्कटता असणारे पालक व नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणालीची आस असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला आणखी उंची प्राप्त झाली होती.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा आटोकाट अवलंब होणे काळाची गरज आहे. शिक्षणक्रांतीमुळे केवळ पाच वर्षात देश महासत्ता बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले,सरपंच सौ. शोभा शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नातून गोरंबेसारख्या डोंगराळ खेडयात उच्च तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिली शिक्षणप्रणाली कार्यान्वित झाली. ही बाब अभिमानास्पद असून येथिल मुले अद्ययावत शिक्षण घेऊन जगाला आव्हिन द्यायला सज्ज होतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शिक्षणात सर्वच पातळयांवर कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहेच. गोरंबे विद्यामंदिर या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची शैक्षणिक गरुडझेप कौतुकास्पद आणि निश्चितच अभिमानास्पदही आहे.
गोकुळचे संचालक अमरिश घाटगे म्हणाले, गोरंबे विद्यामंदिर शाळेत साकारलेली देशातील पहिली फ्युचरिस्टिक क्लासरूम हे या गावाचे संघटित यश आहे. या नव्या अत्याधुनिक शिक्षणप्रणालीमुळे या गावात अधिकाधिक ज्ञानाधिष्टीत सक्षम पिढी निर्माण होईल, याचा विश्वास वाटतो.
कार्यक्रमात फ्युचरिस्टिक क्लासरूम या संकल्पनेचे जनक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांचा सत्कार आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, सरपंच शोभा पाटील यासह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
“पटसंख्या टिकवा…”
शिक्षकांवर ज्ञानदानाची महत्त्वाची जबाबदारी आहे. उच्च विद्याभूषित पिढी घडल्यास देशाची आर्थिक प्रगती होणार आहे. मध्यंतरी प्राथमिक शाळांबद्दल असणारा नकारार्थी दृष्टिकोन कमी होवून या शाळातील पटसंख्या वाढली आहे. आता ही पटसंख्या टिकविण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचा सल्ला, आमदार मुश्रीफ यांनी दिला.
