कोल्हापूर , १६ नोव्हेंबर २०२३ : वाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’ (आयआयईव्ही) या देशातील सर्वात भव्य ईव्ही प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १ ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान हे भव्य प्रदर्शन रंगणार असून या तीन दिवसांत नावीन्यपूर्ण संकल्पना, हरित तंत्रज्ञान आणि वाहन निर्मितीतील उत्कृष्टता अनुभवता येणार आहे. ‘आयआयईव्ही’ प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून पुणे पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे हे प्रदर्शन भरणार आहे. यामध्ये अद्ययावत, नावीन्यपूर्ण, पर्यावरणपूरक वाहतूकीसाठी उपाय आणि सातत्याने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील दूरदर्शी उपक्रमांचे प्रदर्शन केले जाणार आहे. ‘आयआयईव्ही’च्या माध्यमातून उत्पादक, प्रयोगशील आणि नेतृत्वशील उद्योजकांना शाश्वत गतिशीलतेच्या विशाल क्षमतेचा शोध घेण्यासाठी भव्य व्यासपीठ निर्माण होणार आहे.
‘आयआयईव्ही’ २०२३ मध्ये संपूर्ण भारत आणि जगभरातून २०,००० हून अधिक अभ्यागत सहभागी होणार आहे. या भव्य प्रदर्शनातून उपस्थितांना ईव्ही उद्योगाबद्दल खऱ्या अर्थाने जागतिक दृष्टिकोन लाभणार असून या क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण मेळावा ठरणार आहे.
या प्रदर्शनात इलेक्ट्रिक कार आणि बाइकपासून ई-रिक्षा, चार्जिंग स्टेशन आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सेवा आणि उत्पादने यांचा सहभाग असेल. ‘आयआयईव्ही’ केवळ नावीन्यपूर्ण उपायांचे प्रदर्शन नाही तर कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी देशाचे समर्पण अधोरेखित करते. वर्ष २०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर बनण्याचे भारताचे ध्येय आहे आणि दुचाकी विभागात भारत हे उद्दिष्ट यापूर्वीच साध्य करेल अशी अपेक्षा आहे.
“भारताची इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता मर्यादित राहिलेली नाही; हा उद्योग भरभराटीचा असून त्याने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात सध्या अंदाजे २.८ दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने वापरात असून बाजारपेठ अपवादात्मक वाढीसाठी सज्ज झाली आहे. वर्ष २०३० पर्यंत ९४.४ टक्के अशा उल्लेखनीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा (सीएजीआर) अंदाज असून यातून हे लक्षात येते की, इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतो आहे आणि यातूनच शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित होते आहे,” अशी माहिती फ्युचर्स ग्रुप चे संचालक नमित गुप्ता यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, २०२१-२२ मध्ये ८,६६८ वाहनांची नोंद झाली होती. प्रमुख वाहन निर्मिती केंद्र असलेले पुणे इलेक्ट्रिक वाहनातील संशोधन, नावीन्यता आणि उत्पादनात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेच्या वाढीमागे उत्पादन, संशोधन आणि विकासातील पुण्याचे कौशल्य हे प्रेरणादायी आहे, ज्यामुळे ‘आयआयईव्ही’चे आयोजन करण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. ‘आयआयईव्ही’मध्ये उपस्थितांना अद्ययावत ईव्हीचा अनुभव घेण्याची, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि इलेक्ट्रिक वाहतुकीचे भविष्य शोधण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम, चर्चासत्रे, नेटवर्किंग यांचा अनुभव घेता येणार आहे. तसेच उत्पादक, पर्यावरण प्रेमी, तंत्रज्ञान प्रेमी, धोरण रचनाकार आणि वाहनप्रेमींना आकर्षित करणारा हा कार्यक्रम आहे.
आयआयईव्ही शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर ईव्हीच्या सकारात्मक परिणामाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी समर्पित असून शाश्वत भविष्यासाठी योगदान देणारे आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी), इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स (आयईएसए), स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स (एससीजीजे) आणि प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-मुंबई) यांच्या सहकार्याने ग्लोब-टेक मीडिया यांच्यासह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल (एसएमईव्ही), फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी फायनान्सर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ईएमएफएआय) यांसारख्या प्रमुख संस्थांकडून या कार्यक्रमाला पाठिंबा मिळतो. केईआय केबल्स, लुकास टीव्हीएस, मुसाशी ऑटो, सेमको इन्फ्राटेक, केके लाइटिंग, रेडन बॅटरीज, निकोह ईव्ही, डीआरएस ऑटो, आयपीसी इंटरनॅशनल आदींचा यात समावेश आहे.
