२६ जानेवारी दिवशी छत्रपती ताराराणी चौकातील नवभारत ट्रेडींग कंपनीच्या पेट्रोल पंपावर रिक्षा व्यावसायिकांची अक्षरश: रांग लागली होती. प्रत्येक रिक्षाचालकाच्या चेहर्यावर समाधान होते. त्याचे कारणही तसेच होते. तब्बल २ लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळाल्याने अनेक रिक्षाचालकांनी महाडिक परिवाराचे आभार मानले. कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमातून, एका दिवसात तब्बल ११८७ रिक्षाचालकांना विमा संरक्षण मिळाले.
भाजपाचे कार्यकारिणी सदस्य आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ जानेवारीला एक अभिनव उपक्रम पार पडला. प्रजासत्ताक दिनादिवशी सकाळी ९ वाजल्यापासून ताराराणी चौकातील पेट्रोल पंपावर उभारलेल्या मंडपात रिक्षा व्यावसायिकांनी गर्दी केली होती. पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्यासह रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या हस्ते, तुळशीच्या रोपाला पाणी घालून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे चंद्रकांत भोसले, रिक्षा सेनेचे वसंत पाटील, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघाचे विजय गायकवाड, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, करवीर ऑटो रिक्षा युनियनचे सुभाष शेटे, आदर्श ऑटो रिक्षा युनियनचे ईश्वर चैनी, न्यू करवीर ऑटो रिक्षा युनियनचे राजेंद्र थोरावडे, आदिनाथ दिंडे, शर्फूद्दिन शेख, संजय केसरकर उपस्थित होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पार पडलेल्या या विशेष शिबीरातून, तब्बल ११८७ रिक्षा व्यावसायिकांना विम्याचे संरक्षक कवच लाभले. लॉकडाऊनच्या काळात रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान झाले. या कष्टकरी वर्गाला किमान दिलासा देण्यासाठी हा उपक्रम आखल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. या उपक्रमादरम्यान कृष्णराज आणि पृथ्वीराज महाडिक यांनी रिक्षा व्यावसायिकांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही उपक्रमस्थळी भेट दिली. यापुढेही रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे त्यांनी सांगितले.