कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: विद्यापीठाच्या विकासामध्ये अधिसभा सदस्यांची भूमिका प्रभावी असते. त्यांनी सर्व घटकांच्या विकासासाठी आग्रही राहायला हवे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात अधिसभा सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत उमटला.
शिवाजी विद्यापीठाच्या अॅकेडमी ऑफ अॅकेडेमिक अॅडमिनिस्ट्रेशन (ए.ए.ए.) च्या वतीने आज अधिसभा सदस्यांसाठी ‘अधिसभेची कार्यप्रणाली’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ए.पी. कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, माजी परीक्षा नियंत्रक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर आणि वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांनी पॅनल डिस्कशनमध्ये सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
डॉ. ए.पी. कुलकर्णी म्हणाले, अधिसभा सदस्य हे एक प्रकारे विद्यापीठाच्या सर्वोच्च सभागृहाचे विश्वस्त असतात. त्यांनी आपले कार्य केवळ अधिसभेपुरते सीमित न करता वर्षभर विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत राहिले पाहिजे. विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांच्या ते संपर्कात असतात. त्या आधारे विद्यापीठ विकासाच्या विविध सूचना त्यांनी कराव्यात. यामुळे कायद्यातील अपेक्षित भूमिकेपेक्षाही अधिक प्रभावी भूमिका बजावणे त्यांना शक्य होईल.ते म्हणाले, माजी विद्यार्थी हा विद्यापीठाचा अत्यंत महत्त्वाचा घटक पण आपले त्याकडे मोठे दुर्लक्ष होते. माजी विद्यार्थ्यांकडे आपण केवळ आर्थिक लाभाचे साधन म्हणून नव्हे, तर ज्ञानाचे भांडार म्हणूनही पाहायला हवे. त्यांना वेळोवेळी आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अधिसभा सदस्यांनी जरुर पुढाकार घ्यायला हवा. गरजू विद्यार्थ्यांसाठी काही नवीन शिष्यवृत्ती सुरू करावयाच्या असतील अगर जुन्या शिष्यवृत्तींच्या रकमा वाढवायच्या असतील, तर त्या कामी सुद्धा माजी विद्यार्थी निश्चितपणे सहकार्य करण्यास पुढे येतात. आपण केवळ त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचायला हवे.