स्टार प्रवाहवरच्या ‘नवे लक्ष्य’ मालिकेत दिसणार पीएसआय जय सुवर्णा दिक्षितच्या भूमिकेत
स्टार प्रवाहवरील ललित २०५ या मालिकेच्या निर्मात्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता सोहम बांदेकर स्टार प्रवाहच्याच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. सोहमला अभिनयाची आवड होतीच मात्र निर्मात्याची जबाबदारी पार पाडत असताना अभिनयाची आवड द्विगुणीत होत गेली. इतर कलाकारांना सेटवर सीन करताना पाहून हा सीन मी कसा केला असता याचा सोहम अभ्यास करायचा. ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या निमित्ताने अभिनय पदार्पणाचा हा सुवर्णयोग जुळून आला आहे. पीएसआय जय सुवर्णा दिक्षित असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून सोहम सध्या या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतोय.
नवे लक्ष्य मालिकेतील भूमिकेबद्दल सांगताना सोहम म्हणाला, ‘पोलिसांचं कार्य शब्दात मांडता येणारं नाही. त्यामुळे या रिअल हिरोजना साकारणं अतिशय आव्हानात्मक आहे. सीनसाठी वर्दी चढवल्यानंतर एक वेगळंच स्फुरण चढतं. या वर्दीची एवढी ताकद आहे की थकवा अजिबात जाणवत नाही. मी पीएसआय जय ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. पीएसआय जयला लहानपणापासूनच पोलीसी वर्दीचं पॅशन आहे. स्त्रियांचा प्रचंड आदर असलेला, वडिलांचं चॅलेंज स्वीकारुन एमपीएससी टॉप करणारा असा हा जय. जयचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच त्याच्या नावातही तो आईचं नाव लावतो. खऱ्या आयुष्यातही मला माझी आई खुप जवळची आहे. आई-बाबा दोघांचाही खंबीर पाठिंबा असल्यामुळे मी हे आव्हान स्वीकारु शकलो. गेले वर्षभर मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा उपयोग जयची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला होतोय. उदय सबनीस, शुभांगी सदावर्ते, अमित डोलावत, अभिजीत श्वेतचंद्र अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. लक्ष्यवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम ‘नवे लक्ष्य’लाही मिळेल याची मला खात्री आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका नवे लक्ष्य ७ मार्चपासून दर रविवारी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’