गेल्या तीन दशकांमध्ये टीव्हीवरील कार्यक्रमांचे स्वरूप ठरविण्यात ‘झी टीव्ही’ वाहिनीने मूलभूत भूमिका बजावली असून आता आपल्या ‘इंडियन प्रो-म्युझिक लीग (आयपीएमएल)’ या कार्यक्रमाद्वारे ही वाहिनी संगीत क्षेत्रातील रिअॅलिटी कार्यक्रमांचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे. या कार्यक्रमाद्वारे ‘झी टीव्ही’ प्रेक्षकांपुढे संगीतातील जगातील पहिली लीग स्पर्धा सादर करीत आहे. जगातील ही संगीत क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच लीग असेल. क्रीडा क्षेत्राने आजवर अशा अनेक लीग पाहिल्या आणि अनुभविल्या असल्या, तरी संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमातील ही पहिलीच लीग आहे. या लीगमध्ये देशाच्या विविध भागांचे प्रतिनिधित्त्व करणारे सहा संघ असतील आणि ते एकमेकांशी सांगीतिक स्पर्धा करतील. हे संघ एकमेकांशी संगीताच्या क्षेत्रात स्पर्धा करतील. प्रत्येक संघाच्या कर्णधारपदी एक नामवंत पुरुष व एक महिला पार्श्वगायक असेल. शिवाय प्रत्येक संघात एक रिअॅलिटी कार्यक्रमाचा विजेता आणि एक होतकरू गायक असेल. या सहा विभागीय संघांचे कप्तानपद मिका सिंग, कैलाश खेर, साजिद खान, शान, अंकित तिवारी, जावेद अली, असीस कौर, भूमी त्रिवेदी, आकृती कक्कर, पायल देव, नेहा भसिन आणि शिल्पा राव या नामवंत गायक-गायिकांनी स्वीकारले आहे.
या लीगच्या आगामी भागात प्रेक्षकांना काही नामवंत गायक अप्रतिम गाणी गाताना पाहायला मिळतील. मुंबई वॉरिअर्स संघाचा कप्तान कैलाश खेरने ‘पिया के रंग’ हे गाणे ज्या दमदार पध्दतीने गायले, ते पाहून प्रेक्षक अवाक होतील. त्याच्या खर्जातील स्वराने दुसर््या संघातील कप्तानांनाही हे गाणे गुणगुणायला लावले. या गाण्यानंतर कैलाश खेरने मुंबईविषयी वाटणारे प्रेम व्यक्त केले आणि हे शहर आपली प्रेयसी असल्याचे सांगून तो म्हणाला की या शहराला आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान राहील.
मुंबईविषयी आपल्या भावना व्यक्त करताना कैलाश खेर म्हणाला, “लहान असल्यापासून आम्ही मोठ्यांना हे बोलताना ऐकलं आहे की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती जर तुम्हाला मिळाली, तर तुमचं जीवन यशस्वी झालं असं समजा. गाणं गाणं हेच माझं एकमेव प्रेम असून मुंबईने मला एक गायक म्हणून ओळख दिली. मी इथे आल्यावर कैलास झालो आणि मुंबईतच माझं पहिलं गाणं प्रसृत झालं आणि ते खूप लोकप्रियही ठरलं. मला माझी पहिली शाबासकी कुठे मिळाली, ठाऊक आहे? मी जिथे हे गाणं ध्वनिमुद्रित केलं त्या स्टुडिओतील राम संपद हे माझं गाणं ऐकून भारावून गेले. ते म्हणाले की तुझ्यात एक अनोखा हवाहवासा आवाज आहे. ते ऐकून मी प्रथम अवघडून गेलो कारण आजवर माझ्या आवाजाची फक्त चेष्टा झाली होती. त्यामुळे राम संपद हेही माझी थट्टा करीत आहेत की काय, असं मला सुरुवातीला वाटलं. पण त्यांनी मला विश्वास दिला आणि म्हणाले की मी मुंबईला जावं कारण तिथे माझ्या आवाजाची गरज आहे. कारण मुंबईत तुझ्यासारखा आवाज कुठेच नाहीये. मी जेव्हा त्यांच्याकडून ही स्तुती ऐकली, तेव्हा मला जाणवलं की परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली असून माझ्यावर कृपा केली आहे. तेव्हा ही गोष्ट मुंबईत घडली, त्यामुळेच मुंबई शहर ही माझी माशुका बनली असून तशी ती आयुष्यभर राहील.”
कैलाश खेरच्या आवाजाने तुम्ही भारावून गेला असलात, तरी इतर संघांमधील गायकांच्या गाण्यांनीही तुम्ही चकित व्हाल.