कोल्हापूर दि. 07 :- खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील मुरगूड, कागल, आजरा, गडहिंग्लज, व चंदगड या नगरपंचायतींना वैशिष्ट्यपुर्ण कामांकरीता जास्तीत जास्त निधी मिळावा यासंदर्भात नगरविकास मंत्री नाम. एकनाथ शिंदे यांचेकडे केलेल्या मागणीनुसार या तीन नगरपालीका व दोन नगरपंचायतींकरीता नगरविकास विभागाकडून साडेतीन कोटी रु. चा निधी प्राप्त झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, नगरविकास विभागाकडून राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामाकरीता विशेष अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये हाती घ्यावयाची कामे ही नागरीकांच्या लक्षात येतील अशा स्वरुपांच्या कामांनाच प्राधान्य देणेत येते. त्या अनुषंगाने गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील हिरण्यकेशी नदीघाटाचे संवर्धन व विकसीत करणे यामध्ये प्रामुख्याने दशक्रियेसाठी रुम, चेंजींग रुम, पारकट्टा बांधकाम, संरक्षक भिंत, दगडी पायरी वाढीव बांधकाम, पाछवे करणे, स्वच्छतागृह बांधकाम आदी कामे होणार असून आजरा नगरपंचायतीकरीता ओल्या कचऱ्यापासून विद्यूत निर्मीती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याकारणाने विजेची बचत होणार आहे. मुरगूड नगरपालीका वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता नगरपंचायत हद्दीतील रस्त्याची खुदाई झाली असल्याकारणाने याठिकाणी नविन रस्त्यांसाठी एक कोटी रु. चा निधी मंजूर झाला आहे. कागल नगरपालीकाअंतर्गत आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविणार असून यासाठी पंधरा लाख रु. तर चंदगड नगरपंचायत अंतर्गत शिवशक्ती स्थळासभोवती बगिचा व तत्सम मुलभूत सुविधा पुरविणे याकरीता वीस लाख रु. असे एकूण साडेतीन कोटी रु. मंजूर झाली असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, नगरपालीका व नगरपंचायतींच्या मुलभूत व आवश्यक त्या कामांकरीता भरघोस निधी प्राप्त झाला असल्याकारणाने पाचही नगरपंचायतींच्या वतीने खासदार मंडलिक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.