कोल्हापूर, ता. 22 – लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर इतर उद्योगाबरोबर सराफ बाजार सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केली आहे.
अधिक माहिती देताना श्री. गायकवाड म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 15 एप्रिल 2021 पासून इतर व्यावसायिकांबरोबरच सराफ बाजारपेठ पूर्ण बंद आहे. त्यामुळे गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेबरोबर लग्नाच्या हंगामातही व्यवसाय होऊ शकला नाही. यामुळे फक्त सराफ व्यावसायिकच नव्हेतर यावर मोठ्या संख्येने अवलंबून असणाऱ्या कारागिरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अनपेक्षित असणाऱ्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी कारागिराने तयारी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेची मोठी समस्या झाली आहे.
दरम्यान, सोमवारपासून इतर व्यवसाय-उद्योगाबरोबर सराफी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. कारण गेल्या वर्षी कोरोनाची लाट आली त्यावेळपासून बचावासाठी सराफी व्यावसायिकांनी आपापल्या दुकानामध्ये सॅनिटायझर, हँडग्लोजचा वापर करणे, मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर या सर्व गोष्टी सक्तीच्या केल्या होत्या. अगदी संस्थेनेही गुजरी परिसरात सर्वत्र सॅनिटायझरची सोय केली होती व मास्कचे वितरण केले होते. मुळात सराफी दुकानांमध्ये शासकीय निर्बंध व नियमांचे पालन तर केले जातेच शिवाय दुकानामध्ये ग्राहकांची संख्याही मर्यादितच असते. त्यामुळे शहरातील सर्व सराफी दुकाने नियम व अटींचे पालन करून सुरू करण्यास परवानगी मिळावी.
या संदर्भात श्री. गायकवाड म्हणाले, इतर उद्योग-व्यावसायिकांना शासनाने जर सुरू करण्यास परवानगी दिली तर सराफी दुकानेही शासकीय नियम आणि वेळेच्या निर्बंधानुसार सुरू करण्यात येतील.