संत संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती निमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक नेते तथा प्रसिद्ध वक्ते किशनराव बिरादार यांनी डॉ.आ.ह. साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम या साहित्यकृतीवर उत्कृष्ट संवाद साधून संत तुकाराम महाराज जयंती विशेष वाचक संवाद चे २५८ वे पुष्प गुंफले.
‘बुडते हे जन न देखवे डोळा’ या अभंग पंक्तीनुसार सर्वसामान्य जनतेवर स्वप्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या प्रस्थापितांकडून होणारे अन्याय-अत्याचार यामुळे वाढत चाललेला अधर्म. त्याच बरोबर लादल्या जाणाऱ्या अंधश्रद्धेच्या सोवळ्या- ओवळ्या दुष्ट भावना यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी पिळवणूक यातुन लोकोद्धार साधण्यासाठी अगोदर स्वतःचे शुद्धीकरण केले मग समाजव्यवस्थेचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रस्थापितांच्या अनैतिक आणि अनिष्ट रूढी परंपरेविरुद्ध बंड पुकारून सत्याचा वैचारिक विद्रोह करून समाजोन्नती साधणारे खरे साक्षात्कारी संत म्हणजे विद्रोही तुकाराम होते. असे मत किशनराव बिरादार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांचे अध्यक्षतेखाली चला कवितेच्या बनात या चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी आणि आजच्या पिढीत वाचन संस्काराची रुजवणूक करण्यासाठी अविरतपणे चालू असलेल्या २५८ व्या संत तुकाराम महाराज जयंती विशेष वाचक संवादात शिक्षक नेते तथा प्रसिद्ध वक्ते किशनराव बिरादार यांनी डॉ.आ. ह. साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम या साहित्यकृतीवर संवाद साधला. सर्वप्रथम गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ उषा तोंडचिरकर यांनी एक गीत सादर केले. यानंतर संवाद साधताना बिरादार म्हणाले की , सामाजिक न्यायाच्या साक्षात्करामुळे संत तुकारामांनी लोकांच्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणीत बुडवली. भेदभाव मानणाऱ्यांना न जुमानता सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणारे व नवस, भविष्य, श्रद्धा, उपवास आणि संन्यास या सर्वांना अव्हेरून शुद्ध भावना व आचरणाला महत्त्व देत साधु संतांचा आदर केला. ढोंगी भोंदू बाबांचा तिरस्कार केला. ‘बहुता पीडी खळ, त्याचा धरावा विटाळ’. ‘तुका म्हणे यांसी न करिता दंडन, पुढील्या खंडण नव्हे दोषा.’ या विचाराने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपण केलेले कर्म आणि निस्वार्थ सेवा यांना मोलाचे मानायचे. हे सांगतानाच संत तुकाराम महाराजांचे सकारात्मक विचार, चारित्र्य आणि कार्याचा समग्र आढावा घेतला. अत्यावश्यक वाटेल तेथे इतरांच्या मतांचे विवेचनही करत उदाहरणासह सखोल माहिती या पुस्तकात दिली असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत रामराव कोयले, कु.विनय बळीराम पाटील, रामराव ढगे, चवंडा उमाकांत, गोपाळ माने यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर पाहुण्यांचा सन्मान चिन्ह, आभार पत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी संवादक आणि वाचक संवाद चे कौतुक केले. अशा चळवळी समाज बळकटीकरणाचे मौलिक कार्य करत असल्यामुळे यांना पाठबळ देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव फावडे यांनी केले तर आभार प्रा डॉ. सुरेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, प्रा.डॉ. कांत जाधव, सुरेश वजनम, बाबुराव सोमवंशी,बबीता पाटील आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास परिसरातील अभ्यासू शिक्षक, प्राध्यापक , वकील, डॉक्टर ,गृहिणी व विद्यार्थी आदींसह अनेक रसिक मान्यवर उपस्थित होते.
