श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिर, श्री. छत्रपती शाहू हायस्कूल, राजाराम महाविद्यालय, शहाजी लॉ कॉलेजसह आधार कार्ड व हिंदू पंचांग केले सादर
कागल: कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जन्मतारखेचे पुरावेच आज पत्रकारांना सादर केले मंत्री श्री. मुश्रीफ यांचा जन्म २४ मार्च १९५३ रोजीच झालेला आहे, असे म्हणत श्री. गाडेकर यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांचे शाळेचे दाखले, आधार कार्ड व आधार हिंदू पंचांगही सादर केले. या कागदपत्रांमध्ये मंत्री श्री मुश्रीफ शाळा शिकलेल्या कागलचे श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिर, कागलचेच श्री. छत्रपती शाहू हायस्कूल, कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय व शहाजी लॉ कॉलेजसह आधार कार्ड व १९५३ सालाचे हिंदू पंचांग आदी कागदपत्रांचे पुरावे सादर केले आहेत. श्री. गाडेकर म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ यांचा जन्म २३ मार्च १९५३ रोजी रात्री उशिरा झाला, त्यादिवशी श्रीराम नवमी होती. आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जन्म श्री. रामनवमी दिवशी झालेला नाही, असे सांगून त्यांनी काही खोटी कागदपत्रे सादर करण्याचा प्रयत्न केला. मंत्री श्री मुश्रीफ यांचा जन्म तारखेचा दाखला २४ मार्च १९५३ चा असताना श्री. घाटगे यांनी मात्र ते वर्ष १९५४ असण्याचा खोटारडा प्रकार केला. त्यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून कागल शहराला वेठीस धरण्याचा ही काम केले.
यावेळी श्री. गाडेकर पुढे म्हणाले, ही कागदपत्रे चुकीचे आहेत असे वाटत असेल तर त्यांचे चुलते माननीय राजेप्रवीणसिंह घाटगे यांची एक सदस्यीय समिती गठीत करूया. मंत्री श्री. मुश्रीफ यांचे शिक्षण ज्या -ज्या ठिकाणी झाले त्या, श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिर, श्री छत्रपती शाहू हायस्कूल -कागल व राजाराम कॉलेज- कोल्हापूर तसेच शहाजी लॉ कॉलेज या ठिकाणची कागदपत्रेही त्यांनी पडताळावीत आणि ही सगळी कागदपत्रे त्यांनी समरजीत घाटगे यांना सादर करावीत.
यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, प्रवीण काळबर, संजय चितारी, सतीश पवार, सौरभ पाटील, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
