महाराष्ट्र राज्यातील पहिल्याच अशा प्रकल्पाचा समावेश
कोल्हापूर ता.25 : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्र शासनाकडून महानगरपालिकेचे दोन नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये बोंद्रेनगर झोपडपट्टी येथील शासकीय जागेवर बसलेल्या झोपडपट्टीचा व वैयक्तिक स्वरूपातील घरकुलांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचा पहिल्याच प्रकल्पाचा समावेश झाला आहे.
महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घटक क्रमांक चार वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यासाठी अनुदान या घटकाअंतर्गत शहरातील दोन नवीन प्रकल्प शासनास सादर केले होते. यामध्ये शहरातील विविध भागामधील 104 लाभार्थ्यांचा वैयक्तिक स्वरूपातील घरकुलांचा व बोंद्रेनगर येथील शासकीय जागेवर बसलेल्या झोपडपट्टी मधील ७७ घरकुलांचा समावेश करण्यात आलेला आहे. बोंद्रे नगर येथील झोपडपट्टीवासियांचे रहिवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुसार करून त्यांना भोगवटा वर्ग-२ या धारणाधिकारावर मालकी देऊन प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभ मिळणार आहे.
या दोन्ही प्रकल्प अहवालास नवी दिल्ली गृहनिर्माण भवन येथे दि. ३० मार्च २०२२ रोजी झालेल्या ६० व्या केंद्र शासनाच्या व सनियंत्रण समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्याचे इतिवृत्त दि. २५ एप्रिल २०२२ रोजी केंद्र शासनाच्या अवासान आणि शहरी कार्य मंत्रालयाकडून संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. यापैकी बोंद्रेनगर येथील प्रकल्प हा महाराष्ट्रातील राज्यातील पहिला आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. ज्यामध्ये बोंद्रेनगर येथील संपूर्ण झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे. या योजनेचे दोन्ही प्रकल्प अहवाल बनविण्याकरीता प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व कार्यकारी अभियंता नारायण भोसले यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी कालावधीत मान्यता मिळालेली आहे.