कोल्हापूर ता.०८:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) आणि सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन (टाटा ट्रस्ट) यांच्या सहकार्याने मॅन्युअर मॅनेजमेन्ट प्रोजेक्ट राबविला आहे. या अंतर्गत बायोगॅस प्लॅन्ट व स्लरी प्रकिया प्रकल्पाचे उद्घाटन संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी,ता.करवीर येथे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ,माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील व प्रमुख मान्यवराच्या उपस्थित झाले.
स्लरी प्रक्रिया प्रकल्पाची माहिती –
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) आणि सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन (टाटा ट्रस्ट) यांच्या सहकार्याने ‘ मॅन्युअर मॅनेजमेन्ट प्रोजेक्ट राबविला आहे. या अंतर्गत बायोगॅस प्लॅन्ट व स्लरी प्रकिया प्रकल्पासाठी यामध्ये सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन यांच्याकडून रु.४९ लाख ६५ हजार आणि एन.डी.डी.बी यांच्याकडून रु ४३ लाख असे एकूण रु ९२ लाख ६५ हजार इतके अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. यामध्ये सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन यांच्याकडून आलेले १२० फ्लेक्सी बायोगॅस प्लॅन्ट (५०%अनुदानावर) निवडक गावामध्ये महिला दूध उत्पादकांना देण्यात आले आहेत. तसेच स्लरी (द्रवरूप शेणखत) प्रक्रीयेसाठी लागणारी मशिनरी प्रयोगशाळेकडील उपकरणे, स्लरी गोळा करण्यसाठी टॅकर इ. खरेदी करण्यात आले आहेत.
या प्रोजेक्ट अंतर्गत बसवले गेलेले बायोगॅस प्लॅन्ट चे वैशिष्ट असे की या बायोगॅस प्लॅन्टला अंदाजे ४५ ते ५० किलो शेण प्रतिदिन व ५० लिटर पाणी मिक्स करून घालायचे. यातुन तयार होणारा गॅस स्वंयपाक साठी वापरता येतो, यामुळे शेतकरी कुटुंबातील ५ ते ६ लोकांचे जेवण तयार होते महिन्याच्या दोन सिलेंडर ची रक्कम म्हणजे रु २००० मासिक बचत होते. या बायोगॅस मधून अंदाजे प्रतिदिनी ८० ते १०० लिटर मिळणारी स्लरी हि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून शेतकऱ्यांनी या स्लरीचा शेतीसाठी वापर करावयाचा आहे. गोकुळमार्फत जास्तीची स्लरी तिच्या गुणवत्तेनुसार (ब्रिक्स व इलेक्ट्रिकल कण्डक्टिविटी पद्धतीचा वापर करून) 25 पैसे ते २ रुपये प्रति लिटर या दरामध्ये खरेदी केली जाईल. म्हणजे रोज अंदाजे ५०लिटर स्लरी(द्रवरूप शेणखत) चे महिन्याला रुपये १५०० दूध उत्पादकला स्लरी पासून मिळणार आहेत. चार ते पाच जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांना घरगुती अन्न शिजवण्यासाठी वापरलेला गॅस (अंदाजे दोन सिलिंडर प्रतिमहिना) विक्री करण्यात आलेली स्लरी(द्रवरूप शेणखत) असे एकूण अंदाजे रुपये ३५००/- प्रति महिना मिळणार इतके उत्पन्न मिळणार आहे.
मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत गोकुळ मार्फत प्रतिदिन ५ टन क्षमतेचा स्लरी प्रक्रिया प्रकल्प महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना,गडमुडशिंगी येथे उभारण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या स्लरीवर (द्रवरूप शेणखत) प्रक्रिया करून ‘फॅास्फ-प्रो’ या फॅास्परसयुक्त सेंद्रिय खताची निर्मिती केली जाणार आहे.‘फॅास्फ-प्रो’ हे सेंद्रिय खत डीएपी साठी उत्तम पर्याय आहे. तसेच द्रवरूप स्लरीमध्ये सूक्ष्मपोषके, खनिजे व जीवनसत्त्वे मिसळुन ‘ग्रोमॅक्स आणि एमआरएल’ हि पिकावर फवारणी करण्यासाठी तर ‘रूटगार्ड’ हे उत्पादन रोपांची मुळे भिजवून लागवड करण्यासाठी बनवली जाणार आहेत. ही सर्व उत्पादने एन.डी.डी.बी ट्रेडमार्क ‘सुधन’ या नावाने बनवली जाणार आहेत. सदरची उत्पादनेही शेतकऱ्यांना किफायतशीर दरामध्ये उपलब्ध होणार आहेत. सदर उत्पादनांची एन.डी.डी.बी आणि आनंद एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मार्फत वेगवेगळ्या पिकावर चाचणी घेण्यात आली आहे. त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसून आले आहेत. यामध्ये जमिनीचा पोत सुधारून पिकांचे चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. ह्या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय खताचा शेतकर्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा.
भारतास १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असून आता आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या निमित्य संघातील कर्मचा-यांना हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत तिरंगा झेंडा वाटप करणेत येणार आहे. तसेच जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय करणारे ७५ दूध उत्पादक, परराज्यातून जातीवंत २५ पेक्षा जास्त म्हैशी खरेदी केलेल्या १० दूध संस्था, ७५ वय पुर्ण केलेले कोल्हापूर शहरातील १६ दूध वितरक तसेच संघ सेवेतून निवृत झालेले व वयाची पंच्याहत्तरी पार केलेले २० कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ,माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, आमदार राजेश पाटील,आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार के.पी.पाटील,माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके,नविद मुश्रीफ,शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले,रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड,प्रकाश पाटील,सुजित मिणचेकर,बयाजी शेळके,बाळासो खाडे, अंबरिशसिंह घाटगे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, तज्ञ संचालक विजयसिंह मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,एन.डी.डी. बी चे अधिकारी,सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशनचे(टाटा ट्रस्ट) चे अधिकारी, दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक, संघाचे माजी कर्मचारी, अदि उपस्थितीत होते.
