कोल्हापूर, ता. 12 – देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे मत भारतीय सैन्य दलाचे कर्नल एम. सी. मुथ्थान यांनी आज व्यक्त केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुजरी परिसरामध्ये हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंग्याचे उदघाटन होऊन त्याचे गुजरीमध्ये वितरण करण्यात आले.
कर्नल मुथ्थान म्हणाले, प्रत्येक युवकामध्ये देशभक्तीची ज्वाला पेटती असावी. ज्यामधून नेहमीच सकारात्मक विचार देशाच्या योगदानासाठी उपयोगी येतील.
अध्यक्ष राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील हजारो शूरवीरांना अथक संघर्ष करावा लागला होता. देशातील हजारो शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. कित्येक क्रांतिकारकांनी देशासाठी दिलेल्या योगदानातून स्वातंत्र्याची पहाट झाली. आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आपण सर्वजण खूप नशीबवान आहोत की स्वतंत्र अशा भारत देशामध्ये आपला जन्म झाला आहे. त्या शूर वीरांच्या बलिदानामुळेच आपण आज शांत आणि सुंदर आयुष्य जगू शकत आहोत. आजचा हा सुवर्णकाळ आपण इथे आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत. कारण देशाचे वीर जवान सीमेवर स्वतःचा जीव धोक्यात घालून शत्रूशी सामना करत आहेत. या सैनिकांना माझा सलाम.
ते म्हणाले, देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिल्यास देशाला पुन्हा सुवर्णकाळ येण्यास वेळ लागणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करून भारत देश जगातील सर्वोत्कृष्ट देश बनवणे हे आपले कर्तव्य आहे. हर घर तिरंगा या उपक्रमात कोल्हापूर सराफ संघाबरोबर संघाच्या सर्व संलग्न संघटना, सभासदांच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग देऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यादगार बनवूया.
संचालक सिद्धार्थ संतोष परमार परिवारातर्फे 500 ध्वज देण्यात आले. सचिव प्रीतम ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. सचिव तेजस धडाम यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष विजय हावळ, संचालक संजय रांगोळे, शिवाजी पाटील, किरण गांधी, ललित ओसवाल, अशोककुमार ओसवाल, कुलदीप गायकवाड, सिद्धार्थ परमार, कुमार ओसवाल, भैरू ओसवाल, शीतल पोतदार, विजयकुमार भोसले, माजी अध्यक्ष सुरेंद्र पुरवंत, ज्येष्ठ सभासद जे. के. गांधी, वणेचंद ओसवाल यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
