मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाने २०२२ मध्ये अभूतपूर्व यशाची चव चाखल्यानंतर आता प्रगतीची ही घौडदौड २०२३ मध्येही अशीच सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये कंपनीची वार्षिक विक्री दुपटीहून अधिक झाली होती. २०२२ मध्ये ५३,७२१ गाड्या विकून स्कोडा ऑटो इंडियाने मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १२५ टक्के वाढ अनुभवली आहे.
या कार उत्पादक कंपनीने २०२३ साठी नवी उत्पादने, संपर्कजाळे विस्तारण्याच्या योजना आणि अॅक्सेलेरेटिंग ग्रोथ म्हणजेच प्रगतीला चालना देण्याला प्राधान्यक्रम दिला आहे. यातून स्कोडा ऑटो इंडिया दोन आकडी प्रगतीचा वेग गाठू शकेल. तसेच संपूर्ण भारतात कंपनी आपले संपर्कजाळे विस्तारणार आहे आणि देशभरात नवीन शहरांच्या बाजारपेठांमध्येही प्रवेश करणार आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर पेट्र सोल्क म्हणाले, “२०२२ मध्ये ५३,७२१ गाड्यांच्या विक्रीसह भारतात आम्ही पहिल्यांदाच ५०,००० गाड्यांच्या विक्रीचा महत्त्वाचा टप्पा पार केला, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. २०२१ च्या तुलनेत आमची विक्री दुपटीहून अधिक झाली आहे. शिवाय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील आमची उपस्थितीही वृद्धिंगत होत आहे. त्यामुळे २०२२ हे सर्वच आघाड्यांवर आमच्यासाठी अभूतपूर्व वर्ष ठरले आहे. आता २०२३ साठी आम्ही अधिक सक्रिय उत्पादनांसह प्रगतीला चालना देण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहोत. आमची इंडिया २.० उत्पादने अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध असतील, आमच्या नेटवर्कमध्ये सातत्यपूर्ण वाढ होईल, ग्राहक समाधानावर यापुढेही अधिक भर देणे आणि आयसीई आणि ईव्ही अशा गाड्यांची श्रेणी वाढवण्यासाठी अधिक धोरणात्मक भर दिला जाईल, याची खातरजमाही यामुळे होणार आहे.”
काही महिन्यांपूर्वी इंडिया २.० धोरणाअंतर्गत तयार करण्यात आलेली स्कोडा कुशाक एसयूव्ही या कंपनीच्या पहिल्या उत्पादनाला नव्या ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले. त्यामुळे प्रौढ तसेच लहान मुले अशा दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी पूर्ण ५ स्टार्ससह ही भारतातील सर्वात सुरक्षित गाडी ठरली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावर कुशाक २०२३ मध्येही सगळ्यात आघाडीवर राहील. स्लाविया सेडान या इंडिया २.० अंतर्गत तयार करण्यात आलेल्या दुसऱ्या स्कोडा ऑटो गाडीने देशातील प्रीमिअम मध्यम आकाराच्या सेडान विभागात थेट आघाडीचे स्थान मिळवले. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये या विभागात लक्षणीय वाढ झाली होती आणि यात स्लाविया सेडानने बाजारपेठेत दोन अंकी वाटा मिळवला आहे. ५ स्टार सुरक्षा असणारी कुशाक आणि ही गाडी एकाच व्यासपीठावर तयार करण्यात आल्या आहेत. या गाडीत एसयूव्हीप्रमाणे १७९ मिमी.चा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. शिवाय, सेडानमधील अभिजात सौंदर्यही यात दिसून येते.
ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी जपण्याच्या दिशेनेच कंपनीची प्रगती होणे तसेच संपर्कजाळ्यातील वृद्धी आणि ग्राहकांच्या अधिक समीप जाणे, हेसुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे ठरले. वर्कशॉप्समधील कामकाजात अधिक परिणामकारकता आणणे, सेवेचा दर्जा वाढवणे, सुटसुटीत वर्कशॉप्स उभारणे, मोबाइल सर्विस व्हॅन्सचा आवाका वाढवणे आणि विक्री पश्चात प्रणालीमध्ये डिजिटायझेशन वाढवणे अशा उपाययोजनांवर भर देण्यात आला.
या सर्व मुद्द्यांचा विचार करता स्कोडासाठी भारतात २०२२ हे सर्वाधिक महत्त्वाचे वर्ष ठरले आहेच. मात्र आता ही यशोगाथा अशीच सुरू ठेवत स्कोडाची प्रगती उंचावण्यासाठी २०२३ हेसुद्धा महत्त्वाचे वर्ष ठरेल.
