( उदगीर प्रतिनिधी ) – आत्मा अमर असून बाकी सर्व नाशवंत आहे व ही गोष्ट सत्य आहे. जे जे दिसे ते ते नासे, या संत उक्ती प्रमाणे प्रत्येक जीवात्म्याने नाशवंतावरचा मोह त्यागला पाहिजे, सत्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी मनाची सकारात्मकता वाढवणे गरजेचे आहे. संत, ग्रंथ आणि विचार हे सत्याचे ज्ञान देतात. अशा प्रकारे मन बुद्धी स्थिर करून, सत्यत्वाचा शोध घेऊन सुखी अमर जीवात्म्याचा बोध देणारी भगवद्गीता आहे.असे मत ह.भ.प. साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली यांनी व्यक्त केले.
शासकीय दूधडेअरीचे सभागृह उदगीर येथे चला कवितेच्या बनात अंतर्गत श्रद्धा शहाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या २८० व्या वाचक संवाद मध्ये प्रसिद्ध प्रबोधनकार ह.भ.प. साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली यांनी भगवद्गीतेवर बोलताना म्हणाल्या की गीता म्हणजे साऱ्या विश्वाच सार आहे. 710 श्लोकांच्या 18 अध्यायाची ही श्रीमद्भगवद्गीता असून एकूण तीन खंडात याचे वेगळेपण दडलेले आहे. कर्मकांड, भक्तीकांड आणि ज्ञानकांड अशा तीन भागात ही विभागलेली आहे. मी कोण याची ओळख करून देतानाच षडविकारापासून दूर आणि साधुसंतांच्या चरणी नतमस्तक होण्याचा संदेश देखील गीता देते. भगवद्गीता म्हणजे विश्वव्यापक तत्त्वज्ञान असून एकाकीपणा सोडून इतरांना आधार देत संत संगती करून सत्याचा स्वीकार करत शून्याच्या पलीकडे पाहायला शिकवणारी ही गीता आहे. मायावी जीवनात मोहमय दूध पाजले जाते आणि या मोहातच माणूस वाढतो स्वार्थी बनतो. गीतेतील कौरव म्हणजे दुर्गुणांचे प्रतीक तर पांडव म्हणजे सुबुद्धीचे प्रतीक आहेत. कधीही चांगल्या पेक्षा वाईटाची संख्या जास्त असते. ही वाईटाची संख्या चांगल्या सोबतच वाढत असतात.
यानंतर झालेल्या चर्चेत साहित्यिक प्रा.अनिल चवळे, अहमदपूर , मुरलीधर जाधव, मोहन निडवंचे आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांना जन्मदिनानिमित्त ग्रंथ भेट देण्यात आली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना श्रद्धा पाटील म्हणाल्या की हा वाचक संवाद म्हणजे ज्ञानाची अनुभूती देणारा असून आपले विचार प्रगल्भ बनवणारा आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक अखंडितपणे चालणारा ज्ञानयज्ञ असून आम्हा उदगीरकरांचा अभिमान आणि शान आहे. याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यायला पाहिजे.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मिठू पाटील, आनंद बिरादार, हनुमंत म्हेत्रे, प्रा. राजपाल पाटील, तुकाराम धुमाळे, तुळशीदास बिरादार आणि वीरभद्र स्वामी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनंत कदम यांनी केले, स्वागत गीत कु. अवनी वीरभद्र स्वामी हिने गायले. तर आभार गुंडप्पा पटणे यांनी मानले
