कागल, दि. २:श्रीमंत सौ. संयोगिताराजे छत्रपती यांचा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये झालेल्या अवमानाचा कागलमध्ये निषेध जाहीर निषेध करण्यात आला. बस स्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समस्त कागलकर महिलांनी हे आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांपाठोपाठ छत्रपती घराण्यावर प्रतिगाम्यांकडून पुरोगामीत्वावर हल्ला केल्याची व पुन्हा एकदा छत्रपती घराण्याला पुराणोक्त मंत्रपठनाचा फटका बसलेल्या भावना समस्त कागलकरांनी व्यक्त केल्या. जुनाट प्रतिगामी जातीयवादी शक्तींना ठेचण्याचा निर्धारही समस्त कागलकरांनी व्यक्त केला .
यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. शितल फराकटे म्हणाल्या, आधी छत्रपती शिवाजी महाराजांना, नंतर छत्रपती शाहू महाराजांना आणि आत्ता श्रीमंत सौ. संयोगिताराजे छत्रपती यांना छळणाऱ्या या त्याच पुरोगामी शक्ती आहेत.
विजय काळे म्हणाले, प्रतिगामी जातीयवादी शक्तींविरोधात कागलमधून उभारलेल्या या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर क्रांती घडेल. भारतीय संविधानानुसार कोणालाही जात -धर्म, भाषा, वंश, स्थळ आणि लिंग याआधारे कोणताही भेदभाव करता येणार नाही. महिलांनी आता ठणकावून सांगण्याची गरज आहे की, आम्ही राणी अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या लेकी आहोत. येणाऱ्या काळात स्त्री म्हणून अस्तित्व निश्चितच दाखवून द्यावेच लागेल.
नितीन काळबर म्हणाले, आम्ही आमच्या देव -देवतांशी प्रामाणिक आहोत. आमची प्रार्थना आम्हीच करू. देवाला प्रार्थना करण्यासाठी मध्यस्थी कशाला हवी? असा सवालही त्यांनी केला.
“ते आत्ता कोणत्या बिळात लपून बसलेत…… ?”
*शितल फराकटे म्हणाल्या, नाशिकच्या काळाराम मंदिरात एकट्या श्रीमंत सौ. संयोगिताराजे छत्रपती यांचा अवमान झालेला नाही. हा अवमान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याचा आणि विचारांचाही आहे. तसेच; हा अवमान समस्त महिलांचाही आहे. राजकीय स्वार्थासाठी उठसूट -पदोपदी राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा सांगणारे आत्ता कोणत्या बिळात लपून बसले आहेत?
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, सौ. पद्मजा भालबर, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, शामराव पाटील, नितीन काळबर, संजय चितारी आदींची मनोगते झाली.*
