अनोख्या टायटलसोबतच फर्स्ट लुकमुळे लाइमलाईटमध्ये आलेल्या ‘सर्जा’ या आगामी मराठी चित्रपटातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. यातील ‘जीव तुझा झाला माझा…’, ‘धड धड…’ आणि ‘संगतीनं तुझ्या…’ ही गाणी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्यानं ‘सर्जा’बाबतची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाची झलक दाखवणाऱ्या ‘सर्जा’च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत असून, रिलीज झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात ‘सर्जा’च्या ट्रेलरवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.
राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड आणि अभयसिंह माणिकराव हांडे पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान ‘सर्जा’ चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. सुमधूर पार्श्वसंगीत, श्रवणीय गीत-संगीत, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, सहजसुंदर अभिनय आणि सुरेख दिग्दर्शनाची झलक ‘सर्जा’च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. नायक-नायिकेच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. ‘सर्जा’ हि जरी एक रोमँटिक लव्हस्टोरी असली तरी यात समाजातील विविध घटक आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केल्याचं पहायला मिळणार आहे. प्रेमाचे विविध पैलू, प्रेमाचे बदलते रंग, प्रेमाच्या नाना छटा आणि कठीण प्रसंगांमध्येही खुलून येणारं खरं प्रेम हे ‘सर्जा’ चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार असल्याचे संकेत देणारा हा ट्रेलर आहे. याबाबत दिग्दर्शक धनंजय खंडाळे म्हणाले की, आजवर बऱ्याच प्रेमकथा मोठ्या पडद्यावर आल्या असल्या तरी ‘सर्जा’ची कथा खऱ्या अर्थानं अनोखी वाटावी अशी आहे. प्रेम ही एक अशी भावना आहे जी कोणत्याही बंधनात बांधता येऊ शकत नाही. कितीही संकटं आली तरी त्यावर मात करण्याची शक्ती प्रेमात असते. ‘सर्जा’मधील प्रेमकथा प्रेमाची नवी व्याख्या मांडणारी असून, संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनात वसणारी ठरेल अशी आशाही खंडाळे यांनी व्यक्त केली आहे.
