नवीद मुश्रीफ म्हणाले, ग्रामस्थांच्या एकजूटीतूनच गावाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला…….
आलाबाद, दि. ९:आलाबाद ता. कागल ग्रामपंचायतीला ‘महिलास्नेही गाव’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गोकुळचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचा सत्कार झाला. या गावाला नुकताच दीनदयाळ उपाध्याय पंचायत विकास योजनेअंतर्गत तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर जाहीर झाला आहे.
आलाबाद गावामध्ये येऊन श्री. मुश्रीफ यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, डाटा ऑपरेटर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांचा सत्कार व अभिनंदन केले.
भाषणात श्री. मुश्रीफ म्हणाले, आलाबाद ग्रामपंचायतीने ‘महिलास्नेही गाव’ या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. राज्य पातळीवर प्रथम पुरस्कार मिळवत ही ग्रामपंचायत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. पंचायत समितीचे माजी सदस्य जे. डी. मुसळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी आरोग्यविषयक आणि कौशल्यविकास करणारे विविध उपक्रम राबविले. महिला बचत गटातून कर्जपुरवठा, शेळीपालन, गोपालन, किराणा दुकान असे व्यवसाय सुरू केले. गरीब, होतकरू महिलांना पेन्शन योजना राबविली. या सर्व उपक्रमांची पाहणी करून केंद्राने ‘महिलास्नेही गाव’ हा पुरस्कार जाहीर केला. गावाला मिळालेले यश हे सबंध ग्रामस्थांच्या एकजुटीचे संघटित यश आहे.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांसह सरपंच सौ. लताताई कांबळे, उपसरपंच ईश्वरा चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, जोती मुसळे, तानाजी कामते, आसिफ मनोळी, ग्रामसेवक अनिकेत पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
