कोल्हापूर, :आश्चर्य आणि चमत्कार या दोन गोष्टींचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स’. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या ‘सरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत झळकलेल्या टिझर, गाण्यांवरून यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार याची कल्पना आली असेलच. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच दिया (रितिका) ‘मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय… आय लव्ह यू…’ म्हणताना दिसत आहे. आता हे वाक्य नक्की कोणासाठी आहे, रोहित (अजिंक्य) की आदी (पृथ्वी) साठी? रोहितवर मनापासून प्रेम करणाऱ्या दियाच्या आयुष्यात आदीही दिसत आहे. मात्र या तिघांच्याही प्रेमात अनेक चढउतार दिसत आहेत. आता तिघांच्या आयुष्यात आलेले हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स नेमके काय आहेत आणि अखेर दिया कोणाची निवड करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ‘सरी’ पाहिल्यावर मिळणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, चित्रपटाच्या प्रदर्शनाची.
प्रेमाच्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ‘सरी’ चित्रपटातील ‘संमोहिनी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आनंदी जोशी हिचा सुरेल आवाज लाभलेल्या या गाण्याचे संगीतकार अमितराज असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. यापूर्वी कधीही न ऐकलेलं, आल्हाददायी, प्रेमी युगुलांच्या मनाचं ठाव घेणारं, स्वतःचं अस्तित्व हरवून समोरच्यावर जिवापाड प्रेम करणं, ही प्रेमाची व्याख्या सांगणारे ‘सरी’ चित्रपटातील ‘मला का भासे’ हे प्रेमगीतही संगीतप्रेमींना भावले. शैली बिडवाईकर, संजिथ हेगडे यांचा सुरेल आवाज लाभलेल्या या गाण्याचे संगीतकार बी अजनीश लोकनाथ असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केलं आहे.
कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून ‘सरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात रितिका श्रोत्री,अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या प्रमुख भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी दिले आहे.
दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, “पहिल्यांदाच मी मराठी कलाकारांसोबत काम करत असून या तरुण कलाकारांचा अभिनय कमाल आहे. चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल सांगायची गरजच नाही, इतके ताकदीचे हे कलाकार आहेत. या आधी प्रदर्शित झालेल्या टिझर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. ही प्रेमकथा प्रेक्षकांना ५ मे रोजी सिनेमागृहात पाहता येणार आहे.’’