समाजकंटकांवर कठोर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन
कागल, दि. १२:सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्या अपप्रवृत्तींना कागलमध्ये थारा नाही, असा इशारा केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी दिला. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलिसांना दिले आहे.
कागलमधील एकाने टिपू सुलतानचा स्टेटस लावल्यावर तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची व शिव-शाहू विचार मंचची ही निषेध बैठक झाली.
बैठकीत बोलताना श्री. माने पुढे म्हणाले, कागल ही राजर्षी शाहू महाराजांची जनक भूमी आहे. शांतता व सलोखा राहण्यासाठी अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नयेत ही पोलीस आणि आम्हा सर्वांची जबाबदारी आहे.
माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे म्हणाले, सुमारे ४०० वर्षांपूर्वी औरंगजेबाला या मातीत गाडला होता. काही विघ्नसंतोषी अपप्रवृत्ती त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाज दूषित होऊ नये यासाठी अशा घटकांना चाप बसलाच पाहिजे.
माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर म्हणाले, स्टेटस लावून वातावरण दूषित करणाऱ्या समाज विघातक अपप्रवृत्तींचा आम्ही सर्वजण निषेधच करीत आहोत. अशा अप्रवृत्तींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे.
कठोरात कठोर कारवाईची गरज…………..
निवेदनात म्हंटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम रयतेचे आदर्श आहेत. त्यांची बदनामी कदापि खपवून घेतली जाणार नाही. औरंगजेब किंवा महाराष्ट्राची घृणा असलेल्या इतरांचे उदातीकरणही खपवून घेतले जाणार नाही. अशा घटना पुन्हा -पुन्हा घडू नयेत, म्हणून पोलिसांनी कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
यावेळी नवल बोते, नामदेवराव पाटील, नितीन दिंडे, प्रवीण काळभर, सुनील माळी, संजय ठाणेकर, सुनील कदम, संजय चितारी, सौरभ पाटील, सुनील माने, विवेक लोटे, इरफान मुजावर, शशिकांत नाईक, सतीश पवार, नवाज मुश्रीफ,नंदकुमार घोरपडे, संग्राम लाड, विष्णू कुंभार, अमित पिष्टे, बच्चन कांबळे, शिवाजीमामा जाधव गणेश सोनुले, पंकज खलिफ, पंकज घुले, मुकेश मठुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.