कोल्हापूर/प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ‘विद्याधन कोचिंग क्लासेस, जि.प. कॉलनी, कोल्हापूर’ व ‘पायोनियर एज्यु. हब- नॉलेजवाडी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारची (युवक दिनाची) सकाळ ही वाचकप्रेमींच्या दृष्टीने अपूर्वाईची ठरली. नववर्षात फुलेवाडीतील छ. शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात “चला पुस्तके वाचूया!” या नव्याकोऱ्या वाचन पर्वाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमासाठी मा.प्रा. मांतेश हिरेमठ (चिखली महाविद्यालय, शिराळा) व मा.प्रा. जॉर्ज क्रूज (स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ व समुपदेशक) या विचारवंतांचे स्वागत विद्याधन कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. संभाजी सावंत यांनी ग्रंथभेट देऊन केले. त्यानंतर प्रास्ताविकामध्ये सावंत सरांनी या वाचन चळवळीची रुपरेषा विशद केली.
त्यानंतर मा.प्रा.मांतेश हिरेमठ यांनी वाचन चळवळीचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. पुस्तकांच्या सहवासातून होणारी माणसाची विवेकी जडणघडण सरांनी मांडली. त्यानंतर मा.प्रा. जॉर्ज क्रूज यांनी वाचनाचे फायदे तसेच वाचन कसे करावे? का करावे? कोणत्या वयोगटांसाठी कोणती पुस्तके वाचावीत? याविषयी सविस्तर विवेचन केले.
त्यानंतर सकाळच्या आल्हाददायक व प्रसन्न वातावरणात सुमारे 2 तास विद्यार्थी, पालक, वाचकप्रेमी आणि मान्यवरांनी वाचनाचा मनमुराद आनंद लुटला. विद्यासागर ग्रंथालय, बालिंगाचे श्री. कैलाश जांभळे यांच्या सहकार्यातून शेकडो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
संयोजकांच्या वतीने वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठीचा सकारात्मक निर्णय म्हणून ‘आदर्श विद्यालय, नागदेववाडी’ या शाळेला पुस्तकांची भेट देण्यात आली व सहभागी सर्व शालेय विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात पेन देण्यात आले. पायोनियर एज्यु. हब-नॉलेजवाडीचे संचालक प्रा. विनायक यादव यांनी मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्री. तानाजी कवडे (सर) यांनी केले.
या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी व सक्रिय सहभागासाठी गोखले कॉलेजचे प्रा. प्रशांत बेरगळ, श्री. बाजीराव पाटील, श्री. टिपुगडे सर, श्री. आंबेकर सर, श्री. रवींद्र हेडाऊ सर, सौ. लाड ताई, श्री. लोखंडे सर, दिवसे स्कूलच्या भक्ती गुरव (मॅडम), वाचक अनिल माने हे मान्यवर लाभले. कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशन, कोल्हापूरचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.
हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांनी विद्याधन कोचिंग क्लासेस व पायोनियर एज्यु. हब-नॉलेजवाडी यांचे कौतुक केले.