निधी 100 टक्के खर्च करण्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे निर्देश
कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : 221 कोटीच्या अतिरिक्त मागणीसह 581 कोटीच्या प्रस्तावाच्या ठरावास आज मंजुरी देण्यात आली. 21 मार्च रोजी माणगाव परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी 50 लाखाची मागणी करण्याचे तसेच सर्व विभागांनी दिलेला निधी 100 टक्के खर्च करावा त्यानुसारच पुढील वर्षाचा निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेमधील राजर्षी शाहू सभागृहात झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी सुरूवातीला सर्वांचे स्वागत केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आढावा दिला. सन 2019 साठी 271 कोटी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली होती त्यापैकी 162.25 कोटी शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 103.7 कोटी वितरीत करण्यात आले आहे. त्यापैकी 85 कोटी 12 लाख 75 हजार खर्च झाले. पालकमंत्री श्री. पाटील यांनी सुरूवातीलाच खर्च न झालेल्या विभागांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना निधी खर्च का होत नाही त्याबाबत विचारणा केली. यामध्ये वनविभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश होता. राजाराम महाविद्यालयामधील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 महिना उपलब्ध करावे, अशा गतीने कामकाज करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
पोलीसांच्या निवास व्यवस्थेबाबत लवकरच बैठक घेणार आहे त्यावेळी त्याबाबत सविस्तर आढावा घेतला जाईल, असे ते म्हणाले. आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेवून कार्डीयाक रूग्णवाहिका जिल्ह्याला उपलब्ध करून दिली जाईल. इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयाच्या बाबतीतही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्याच्या समवेत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावू, असेही पालकमंत्री म्हणाले. ग्रामीण रूग्णालये, आरोग्य उपकेंद्र याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा दिवसात बैठक घेवून अहवाल द्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
कर्ज मुक्तीबाबत माहिती देताना ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात उपसमितीमार्फत त्यांचीही माहिती घेणे सुरू आहे. त्यांनाही 1 लाखापर्यंतची माफी मिळण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी माहिती दिली. महापुरामुळे 78 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित पिकांचे चालू कर्ज माफ तसेच ज्यांनी कर्ज घेतल नाही त्यांना तिप्पट मर्यादा, पुरबाधित शेतकऱ्यांना अशा दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. 121 कोटी प्राप्त अनुदानापैकी 36 कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे. 15 दिवसात उर्वरित वाटप पूर्ण होईल.
जिल्ह्याच्या महापुराचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याला पाठविला होता, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, 956 कोटी राज्याला आलेले आहेत. मुख्य सचिवांशी माझी नुकतीच चर्चा झाली असून हा निधी कशासाठी आला आहे त्याबाबत लवकरच खुलासा होईल. जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना 300 कोटींचे वाटप झाल्याचेही ते म्हणाले.
माणगाव परिषद शतक महोत्सवी कार्यक्रमास 50 लाख
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील परिषदेला 21 मार्च रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा शासनाच्यावतीने व्हावा त्यासाठी 50 लाखाची मागणी करण्याची सूचना पालकमंत्री श्री. पाटील तसेच खासदार श्री. माने यांनी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. कामत यांना केली. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. कामत यांनी यावेळी अनुसूचित जाती उप-योजना (विशेष घटक योजनेचा) आढावा दिला.
क वर्ग यात्रा स्थळे
आजच्या बैठकीमध्ये राधानगरी तालुक्यातील नांदेकरवाडी, हेळेवाडी, मोहडे बु., बनाची वाडी, पिरळ, सोन्याची शिरोली, चंद्रे, हराळे, शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे, शिरोळ तालुक्यातील हरोली, भुदरगड तालुक्यातील देवूळवाडी, कलनाकवाडी, कूर, हातकणंगले तालुक्यातील भादोले, गडहिंग्लज तालुक्यातील क.नूल, गगनबावडा तालुक्यातील बोरबेट, धुंदवडे, करवीर तालुक्यातील न्यू वाडदे, कागल तालुक्यातील निढोरी, बेळवले खु., सुरूकली येथील यात्रा स्थळांना क वर्ग मान्यता देण्यात आली.