कोल्हापूर /प्रतिनिधी
अभय सिन्हा,’अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ व ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रस्तुत दिपक नायडू दिग्दर्शित आणि शंकर रोहरा ,दिपक नारायणी निर्मित ‘भयभीत’ चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटगृहात भयभीत करणारा गुंतागुंतीचा खेळ रंगणार असल्याची माहिती अभिनेता सुबोध भावे यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.
गूढ भास आणि अनाकलनीय गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते. या भीतीमागे काही गुपितंही दडलेली असतात. काहींसाठी ते भास असता त काहींसाठी भासापलीकडे बरंच काही. याच भास-आभासाचा अनुभव अनेकांना आलेला असतो ज्यातून तयार होतात काही अगम्य आणि गूढ गोष्टी. आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ याचा अनपेक्षित अनुभव देणारा भयभीत हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आईच्या अचानक झालेल्या मृत्यनंतर मानसिक धक्का बसणाऱ्या श्रेयाच्या वागणुकीत रहस्यमयी बदल व्हायला सुरूवात होते. श्रेयाला होणाऱ्या भासामागे नक्की काय गूढ दडलंय? याचा शोध घेताना प्रत्येक टप्प्यावर नवीन ‘खेळ’ सुरु होतो. केवळ शक्यतांचा अंदाज बांधून होणाऱ्या भासाची त्या भासामागे असणा-या व्यक्तीची उकल होते न होते, असं वाटत असतानाच काहीतरी आणखी अतर्क्य गूढ रहस्य समोर येऊन उभं ठाकतं आणि वेगळा खेळ रंगतो. भ्रम-विभ्रमामागे नक्की काय वास्तव आहे? याचा भयानक गुंतागुंतीचा रंगणारा खेळ म्हणजे भयभीत हा चित्रपट.या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे,अभिनेत्री पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘भयभीत’ चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे व पूर्वा गोखेले बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी मृणाल जाधव ही चुणचुणीत बालकलाकार या चित्रपटात आहे. भोजपूरी चित्रपटात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मधू शर्मा ही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.तर रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली या सिनेमातील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.त्याचबरोबर अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते तर कलादिग्दर्शन एकनाथ राणे आणि साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. अर्जित सिंग व मीनल जैन–सिंग यांनी चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे.अॅक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत. तरी आगळावेगळा भयभीत चित्रपट सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जावून पहावा असे आवाहन चित्रपटातीलकलाकारांनी पत्रकारांशी बोलताना केलयं.
पत्रकार परिषदेला दिग्दर्शक दिपक नायडू,सहनिर्माते अविनाश रोहरा उपस्थित होते.