कोल्हापूर /प्रतिनिधी
स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या निष्ठावान आणि पराक्रमी सवंगड्यांची मोलाची साथ लाभली त्यापैकी एक म्हणजे शूरवीर तानाजी मालुसरे.कोंढाण्याच्या लढाईत धारातीर्थ पडल्यानंतर त्यांचा देह उमरठ येथे नेण्यात आला. या सगळ्या रोमांचित प्रवासाची आणि त्यावेळच्या थराराची अनुभुती येण्यासाठी आणि सर्वांना याची माहिती होण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे स्मारक समिती उमरठ यांच्या वतीने आणि मैत्रेय प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या संयोजनाखाली सहा टप्प्यात ‘सिंहगड ते उमरठ नरवीर तानाजी पुण्ययात्रा ‘यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावंत आणि पराक्रमी सवंगडी असणारे नरवीर तानाजी मालुसरे यांना दिं.४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री झालेल्या कोंढाणा लढाईत वीरमरण आले. त्यावेळी त्याचा देह सिंहगड वरुन पालखीतून सन्मानपूर्वक राजगड पायथा, तोरणा घेरा, मावळातून केदळ कडामार्गे कोकणात उमरठला नेण्यात आला. या सर्व इतिहासाबद्दल थोडेच साहित्य उपलब्ध आहे. यामुळे नेमक्या कुठल्या वाटेने गेले, काय-काय अडचणी आल्या, किती दिवस लागले, किती थांबे घेतले, याबाबत सर्व माहिती मिळावी आणि त्यावेळचा तो थरार अनुभवता यावा म्हणुन मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांच्या पुढाकाराने सिंहगड ते उमरठ पुण्ययात्रा ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शंभरहून अधिक जणांनी सहभाग घेतला. शुक्रवारी रात्री निघालेली पालखी २६ तसाचा प्रवास करत रविवारी पहाटे आपल्या मुक्कामी पोहचली. अंदाजे १३८ किलोमीटर इतका डोंगर, दऱ्यातील प्रवास रोमांचकारी आणि थक्क करणारा होता. ही पालखी ९० गावातून पुढे गेली, त्या स्थानिक लोकांनी इतिहासाला उजाळा देत अनेक महत्वपूर्ण माहिती दिली. या सर्व वाटा आणि या माहितीचे संकलन करण्यात आलं आहे, जेणे करुन या पुण्ययात्रेच्या मार्गाचा भूगोल समजावा. अशी माहिती मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. विश्वनाथ भोसले, सागर आफळे, यशपाल सुतार,शिवप्रसाद स्वामी, राजेश पाटील,रितेश मोरे, दशरथ गोडसे, विश्वास जोखे,सुचित हिरेमठ,उपस्थितीत होते.