कोल्हापूर,दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोव्हिड-19 च्या संचार बंदी काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम चालविला असून कोल्हापूर जिल्हयातील अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा अकुशल दिव्यागांनी त्यांच्या शारिरीक क्षमतेनुसार व कुशलतेप्रमाणे रोजगार हमी योजनेबाबत जॉब कार्ड तयार करून घेण्यासाठी आपल्या गावातील ग्रामसेवकांशी संपर्क साधावा. याबाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मित्तल यांनी केले आहे.