कोल्हापूर : नगरसेवक असताना केलेलं एखादं काम लोकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहण्याचा आनंद हा वेगळा असतो. असा आनंद संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलेल्या सन्मानामुळे सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. रूपा शहा यांना मिळाला.
प्रा. डॉ. शहा या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेले जवळपास 40 वर्षे कार्यरत आहेत. या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यावर महिला लोकप्रतिनिधी म्हणूनही उत्तम काम करू शकतात हे दाखवून देण्यासाठी प्रा. डॉ. शहा यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवली होती. 1990 ते 1995 या कालावधीत नगरसेविका म्हणून काम करताना त्यांनी अनेक लक्षणीय व अनुकरणीय गोष्टी केल्या होत्या. नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे हा त्यांनी सुरू केलेला पायंडा! दर आठवड्याला ठराविक वेळी प्रभागातील नागरिक व अधिकारी यांना एकत्र आणून नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करणे, केवळ प्रभागातील प्रश्नांचा अभ्यास न करता संपूर्ण शहराच्या प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी काय करता येईल याविषयी सूचना करणे, आपल्या प्रभागातील भूजल साठे शुध्द आणि वापरात राहावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अशा गोष्टींबरोबरच भास्करराव जाधव वाचनालयाच्या राजर्षि शाहू व्याख्यानमालेला लोकप्रिय बनवणे, उद्यानांचा विकास करणे अशा बाबीही त्यांच्याकडून झाल्या. याच काळात श्री महालक्ष्मी मंदिरानजीक असलेल्या संत गाडगे महाराज चौकातील संत गाडगे महाराजांच्या पुतळयाचे सुशोभिकरण करून त्या पुतळयावर छत्री बसवण्याचे कामही प्रा. डॉ. शहा यांनी केले होते. या बाबीला पंचवीसहून अधिक वर्षे उलटल्यानंतरही संत गाडगे महाराज अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी त्याचे स्मरण ठेवले.
संत गाडगे महाराज यांच्या पुतळयाच्या परिसराचे सुशोभिकरण व पुतळयावर कायमस्वरूपी छत्रीची व्यवस्था या कामासाठीची कृतज्ञता म्हणून अध्यासनातर्फे संत गाडगे महाराज समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळयात प्रा. डॉ. शहा यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, अध्यासनाचे कार्याध्यक्ष एस. एन. पाटील तसेच उपाध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.