कोल्हापूर, दि. २२ जानेवारी: विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्था यांचे विविध स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ हा अभिनव उपक्रम घोषित केला आहे. या उपक्रमाची सुरवात येत्या २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठामध्ये ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ने होणार आहे. हा उपक्रम पूर्णतः यशस्वी करण्याचा निर्धार विद्यापीठ प्रशासनाने केला असून त्यासाठी आवश्यक तयारी वेगात चालविली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भात असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित घटकांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयांत यावे लागते. विशेषतः त्यांच्या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट देऊन काही कारणांमुळे प्रलंबित असल्याने अनेकांचा वेळ, ऊर्जा व निधी खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन उच्च व तंत्र विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत विभागीय ठिकाणीच उपस्थित राहून सर्व संबंधित घटकांची भेट घेऊन प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करण्याचा मानस मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. त्यानुसार विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात बैठका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याची सुरूवात कोल्हापूर विभागापासून होत आहे. त्यानुसार ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमाची सुरवात सोमवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात होणार आहे.
निवेदने स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पोर्टल-या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध समित्या गठित करून कामकाजास प्रारंभ केला आहे. विशेषतः विविध घटकांच्या प्रश्नांची निर्गत समाधानकारक पद्धतीने करता यावी, यासाठी विद्यापीठाने निवेदने स्वीकारण्यासाठी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ याच नावाने स्वतंत्र पोर्टल निर्माण केले आहे. याची लिंक विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या वेबसाईटच्या होमपेजवर ठळकपणाने देण्यात आली आहे. त्यावर जाऊन नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे केली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे १०८ व्यक्ती, संघटनांनी ऑनलाईन निवेदने सादर केली आहेत. त्यांच्याशी अनुक्रमे मा. मंत्री महोदय संवाद साधतील. त्यानंतर ऐनवेळी निवेदने घेऊन येणाऱ्या नागरिकांनाही मंत्री श्री. सामंत वेळ देतील.