कोल्हापूर/प्रतिनिधी : पती शहीद होऊन सुद्धा त्यांच्या नावे दिलेला प्लॉट मिळविण्यासाठी १४ वर्षे संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी दहा वाजता आत्मदहन करणार असल्याचा इशारा वीर पत्नी वृषाली महादेव तोरस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
गडहिग्लज येथील वृषाली तोरस्कर यांचे पती महादेव तोरस्कर हे २००१ ला अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. याबद्दल शासनाने त्यांना बड्याचीवाडी( ता. गडहिग्लज) येथील विजयनगर येथे २००७ साली दोन गुंठ्याचा प्लॉट दिला. २००८ साली बांधकाम करण्यासाठी वैशाली तोरस्कर यांनी साहित्य आणले. बांधकामाला सुरुवात सुद्धा झाली निम्मे बांधकाम झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी विरोध केला आणि बांधकाम थांबविले. या प्रकरणी तोरस्कर यांनी विजय मिळवला.न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल सुद्धा दिला; मात्र पुन्हा बांधकाम करण्यास स्थानिक दोन लोक विरोध करत आहेत पूर्वी विरोध असलेला कमी येऊन सध्या दोनच लोक विरोध करत आहेत.
पुन्हा पुन्हा या बांधकामासाठी व्यत्यय आणत आहेत. माझ्याबरोबर दुसऱ्या विरपत्नीला त्याच ठिकाणी प्लॉट मिळाला त्याचे बांधकाम ही पूर्ण झाले; मात्र मला त्या ठिकाणी बांधकामास विरोध केला जातो. या जागेवर कोणतेही आरक्षण नसताना न्यायालयीन स्थगिती देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले नाही.देशासाठी पती शहीद झाले असताना सुद्धा जर असाच संघर्ष करावा लागत असेल तरी याच्यासारखे दूसरे दुःख नाही. १४ वर्ष कोर्टकचेऱ्यामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागतो. या सर्व त्रासाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा तोरस्कर यांनी दिला आहे.तोरस्कर यांच्या बाजूने आजी माजी सैनिक संघटनेने सुद्धा अनेक वेळा आंदोलन करून निवेदन दिले आहे मात्र याला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही यावेळी आजी-माजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे, बी. जी. पाटील कुमार पाटील तुकाराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.