कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): स्वतंत्रपणे महिला आणि बालकांसाठी कशा पध्दतीने योजना राबविता येतील. याबाबत प्रत्येक विभागाने नियोजन करावे. त्या राबविण्याबाबत सहभागी व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला सदस्य सचिव तथा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, परिविक्षा अधिकारी बी.जी.काटकर, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनिता नाशिककर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, महिलांसाठी असणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक योजनांकरिता जेंडर बजेट प्रमाणे योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाला प्रशिक्षण द्यावे. स्वतंत्रपणे प्रत्येक विभागाने महिला सक्षमीकरणासाठी काय केले आहे याची माहिती घ्यावी. तसेच काय करणे अपेक्षित आहे याबाबत पत्रक पाठवावे. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.
हुंडा पध्दतीच्या विरोधात जनजागृती व सहाय्य संबधाने करण्यात आलेली कार्यवाही, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंमलबजावणीबाबतची कार्यवाही, महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी समुदाय यांच्या सामाजिक समावेशनासाठी करण्यात आलेली कार्यवाही आदींबाबत आढावा घेतला.
या बैठकीला महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे, शशिकला बोरा, डॉ. प्रमिला जरग, सुनिता गाठ, अर्चना प्रार्थरे, प्रिती घाटोळे आदी उपस्थित होते.