कोल्हापूर दि.२४ कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक १६/०२/२०२१ रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रशासनाने जाहीर केल्या. या यादयांवर आक्षेप घेण्यासाठी दिनांक २३/०२/२०२१ हा अंतिम दिवस होता. प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर या प्रारूप यादयांत मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे लक्षात आले आहे. हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे चुकीच्या प्रभागांच्या प्रारुप यादीत आली आहेत. या सर्व सुरु असलेल्या मतदार याद्यांतील घोळाबाबत भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज निवडणूक आयोगाकडे ईमेल द्वारे तक्रार दाखल करण्यात आली.
दिनांक १८ व २३ रोजी भाजपाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त यांना प्रत्यक्ष भेटून या मतदार याद्यांतील सुरु असलेल्या गंभीर त्रुटी बाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. हा गोंधळ केवळ एक /दोन प्रभागांफुरता मर्यादित नसून शहरातील बहुतेक सर्वच प्रभागाच्या प्रारूप याद्यात हे घडले आहे. उदा. प्र.क्र.३२ मध्ये २१६३, प्र.क्र.३३ मध्ये सुमारे २१०० तर प्र.क्र.४८ मध्ये सुमारे १८०० नावांवर हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत तसेच गोंधळाचा अवाका पाहता प्रशासनाने सध्याच्या प्रारूप याद्या पूर्णपणे रद्द करून नवीन प्रारूप याद्या कराव्यात अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व हरकतीचे निरसन केले जाईल असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप याद्यांची दुरुस्ती होणे अशक्य आहे. तसेच याद्यातील एवढे प्रचंड गोंधळ अजूनही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे अनेक नागरिक हरकती घेण्यापासूनही वंचित राहिले आहेत. यातून निवडणूक आयोगाच्या ‘Free And Fare Elections’ या मार्गदर्शक तत्वाची अवहेलना होण्याचा संभव असून अनेक नागरिक त्यांच्या मतदानाच्या मूलभूत हक्कापासूनही वंचित राहण्याचा धोका आहे.