कोल्हापूर ता.21 : महापालिकेचे कोरोना केअर सेंटर गोर गरीबांना आधार आहेत. याठिकाणी कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. आत्तापर्यंत 3 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन गेलेली आहेत. यामध्ये कराड येथील गंभीर अवस्थेत आलेला एका 56 वयाच्या रुग्णाचा समावेश आहे. सलग 9 दिवस केलेल्या उपाचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. शिवाजी विद्यापीठ डीओटी सेंटरमधील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाला यश मिळाले.
कराड, सांगली, सिंधुदूर्ग येथील रूग्ण तेथे व्हेंटीलेटर उपलब्ध न झालेने कोल्हापूर शहरात उपाचारासाठी येत आहेत. कराडमधील एक रूग्ण दि.10 मे 2021 रोजी कोल्हापूर शहारामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असताना श्वसनाचा त्रास होत असलेने व्हेंटीलेटर बेड शोधत होते. परंतु त्यांना कोठेही व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होत नव्हता. तसेच ते शिवाजी विद्यापीठ डिओटी येथे व्हेंटीलेटर बेडच्या चौकशीसाठी आले. ऑक्सिजन न मिळाल्यास त्याच्या जिवाला धोका होता. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ येथील कोरोना केअर सेंटरवरील ड्युटीवर असलेले वैद्यकिय अधिकारी यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांना दाखल करुन घेतले. संबंधित रूग्णाची ऑक्सिजनची पातळी 70 टक्के खाली आली होती. त्यांना आवश्यक असलेला उपचार दाखल होताच देण्यात आला. या सेंटरमधील डॉक्टरांनी दिवसरात्र त्याच्यावर नजर ठेवून होते. डॉक्टरांच्या या विशेष प्रयत्नामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. दि.19 मे 2021 रोजी रुग्ण पुर्णत: बरा होऊन त्याला डिस्चार्ज देणेत आला.
सेंटरमध्ये 1692 जणांना उपचार-डीओटीमध्ये एकुण 9 वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. ते चोवीस तास रुग्णांच्या सेवेत आहेत. महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक या सेंटरचे नोडल ऑफिसर असून त्यांचेही या सेंटरवर बारीक लक्ष असते. 11 एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी उपचार व रूग्णांचे जेवण मोफत स्वरूपात दिले जाते. 350 इतक्या बेडची क्षमता असून 50 बेड हे ऑक्सिजन रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आज अखेर 1692 रूग्णांनी उपचार घेतलेला आहे. त्यात कोल्हापूर शहराचे 1047 रूग्ण दाखल झाले होते. तर ग्रामीण भागातील 631 रूग्णांनी लाभ घेतला आहे. त्याचबरोबर जिल्ह्या बाहेरील एकुण 14 रूग्ण याठिकाणी दाखल झालेले होते.