कागल केअर सेंटरमध्ये कोरोना आढावा बैठक व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप
कागल/प्रतिनिधी :जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत मानवी जीवन पूर्ववत होणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन या केंद्राला देण्यात आली.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लसीकरणात महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरेल. राज्य ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० हजार मेट्रिक टन पूर्ततेचा निर्धार केलेला आहे. कोरोनाची पहिली लाट गेल्यानंतर लग्न, निवडणुका, पर्यटन आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले. या गर्दीमुळे हा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत गेला. जनता कर्फ्यू संपला तरी अजूनही थोडी दक्षता घ्या, जागृतता बाळगा. त्याचे परिणाम निश्चितच चांगले दिसतील. गेले सव्वावर्षभर सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या या लढाईच्या आपण अंतिम टप्प्यात आहोत. जनतेने अजून थोडं सहन करावं, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.